सावंतवाडीत जयानंद मठकर व्याख्यानमालेचं आयोजन..!
जयानंद मठकर स्मृति पुरस्कार सतीश लळीत यांना जाहीर
सावंतवाडी :
श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन, सावंतवाडीच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार जयानंद मठकर व्याख्यानमाला २०२४ च आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि. ४ एप्रिल २०२४ रोजी सायं. ६.०० वाजता होणार आहे. उद्घाटक म्हणून मुंबई येथील पत्रकार राजू परुळेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर रविवारी पुरस्कार प्रदान समारंभ होणार असून जयानंद मठकर स्मृति पुरस्कार निवृत्त माहिती जनसंपर्क अधिकारी तथा घुंगूरकाठीचे अध्यक्ष सतीश लळीत यांना जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवार दि. ४ एप्रिल २०२४ रोजी भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने यावर राजू परुळेकर यांच व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी अॅड. देवदत्त परुळेकर राहणार आहेत. शुक्रवार दि. ५ एप्रिलला लोकसाहित्यातील रत्री यावर लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. मुकूंद कुळे आपले विचार मांडणार आहेत.अध्यक्षस्थानी डॉ. गोविंद काजरेकर असणार आहेत. तर शनिवार ६ एप्रिलला भारतीय स्त्रिया प्रश्न आणि प्रश्न यावर साहित्यिक डॉ. ऐश्वर्या रेवडकर मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी डॉ. विजयालक्ष्मी चिंडक राहणार आहेत. तर रविवारी पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. माजी आमदार, स्वा. सैनिक, साप्ताहिक वैनतेयचे माजी संपादक व ज्येष्ठ समाजवादी नेते जयानंद मठकर यांच्या आठव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने माजी आमदार जयानंद मठकर स्मृति पुरस्कार निवृत्त माहिती जनसंपर्क अधिकारी, घुंगूरकाठीचे अध्यक्ष सतीश लळीत यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. कमलताई परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी कोकणातील बदलते पर्यावरण आणि कातळशिल्पांचे जतन यावर सतीश लळित आपले विचार प्रकट करणार आहेत. तर अध्यक्षस्थानी प्रसाद गावडे असणार आहेत. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर येथे होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.