*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गझलकार यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे लिखित अप्रतिम वृत्तबद्ध कविता*
*कविता माझी*
येते कशी जाते कशी नाही कधी सांगत मला
दुःखात येते धावुनी जग दावते नाचत मला //ध्रु//
कविता सखी कविता प्रिया ती नांदते माझ्यासवे
अंधार होता लावते प्रेमातले लामण दिवे
केसात गजरा लावते अन् हासते वेचत मला
दुःखात येते धावुनी जग दावते नाचत मला //१//
युद्धात येते सोबती क्रांतीत गाते शाहिरी
देते उन्हाला सावली पोटात होते बाजरी
ज्या ज्या क्षणाला पाहिजे त्या त्या क्षणी संगत मला
दुःखात येते धावुनी जग दावते नाचत मला //२/
श्वासात ती ध्यासात ती, ती जीवनाची प्रेरणा
कल्पान्त येवो आजही पण हीच माझी साधना
रात्रीस येते,थांबते अन् जागते वाचत मला
दुःखात येते धावुनी जग दावते नाचत मला //३/
+++
यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
बदलापूर
९८९२३३३६८३