होळीच्या सणासाठी चाकरमानी कोकणात निघाल्याने मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
होळीच्या सणासाठी चाकरमानी कोकणात निघाल्याने मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. इंदापूर ते माणगाव दरम्यान चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होत असून प्रवासी अर्ध्यावरच अडकून पडले आहेत. महामार्ग क्रॉसिंगचे काम अद्याप पूर्ण झाले नसून त्याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. महामार्गावर छोट्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे गावी कधी पोहोचणार, असा प्रश्न उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना पडला आहे. दोन तीन दिवस सुट्या आणि होळीचा सण असल्याने शिमगोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमान्यांनी मोठ्या प्रमाणात कोकणात रवाना केले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग पोलीस घटनास्थळी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.
मुंबई गोवा महामार्गाचे काम 12 वर्षांपासून सुरू आहे 440 किमी लांबीच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम जवळपास 12 वर्षांपासून सुरू असून खर्च जवळपास दुप्पट झाला आहे. त्यातही 112 किलोमीटर रस्त्याचे काम 23 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला होता, मात्र मार्चनंतरही काम पूर्ण झाले नाही. मे महिन्यात काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.