You are currently viewing मुस्तफिझूर-रचिनच्या बळावर चेन्नईने आरसीबीचा सहा गडी राखून केला पराभव

मुस्तफिझूर-रचिनच्या बळावर चेन्नईने आरसीबीचा सहा गडी राखून केला पराभव

*ऋतुराजची कर्णधार म्हणून विजयी सुरुवात*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएल २०२४ च्या १७व्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात पहिला सामना खेळला गेला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सहा विकेट्सने पराभव केला. सीएसकेने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ गडी गमावून १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाने आठ चेंडू बाकी असताना सहा गडी राखून सामना जिंकला.

आरसीबीने दिलेल्या १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने दमदार सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांच्यात पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी झाली जी यश दयालने भेदली. या सामन्यात कर्णधार १५ धावा करू शकला. अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. रहाणे आणि रचिन रवींद्र यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. २७ धावा करू शकणाऱ्या रहाणेच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅरिल मिशेलने दोन षटकारांच्या मदतीने २२ धावा काढल्या.

शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाने चेन्नईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांमध्ये ३७ चेंडूत ६६ धावांची नाबाद भागीदारी झाली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या दुबेने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. त्याचवेळी या स्टार अष्टपैलूने १७ चेंडूत २५ धावा केल्या. या सामन्यात दोन्ही फलंदाज अपराजित राहिले. आरसीबीतर्फे कॅमेरून ग्रीनने २ तर यश दयाल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने सीएसकेला १७४ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात संघाची सुरुवात दमदार झाली होती. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी झाली. पाचव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मुस्तफिझूर रहमानने कर्णधाराला आपला बळी बनवले. ३९ वर्षीय फलंदाज आठ चौकारांच्या मदतीने ३५ धावा करू शकला. यानंतर संघाला तिसरा धक्का रजत पाटीदारच्या रूपाने बसला जो खाते न उघडताच तंबूमध्ये परतला. तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. आश्चर्य म्हणजे आरसीबीचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलही गोल्डन डकचा बळी ठरला. सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दीपक चहरने त्याला आपला बळी बनवले. विराट कोहली आणि कॅमेरून ग्रीन यांच्यात चौथ्या विकेटसाठी ३५ चेंडूत ३५ धावांची भागीदारी झाली. मुस्तफिजुर रहमानने किंग कोहलीला आपला बळी बनवले. बांगलादेशच्या या गोलंदाजाने १२व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कॅमेरून ग्रीनचा त्रिफळा उध्वस्त केला.

या विकेटनंतर संघाला चांगल्या भागीदारीची गरज होती, आरसीबी ७८ धावांवर पाच गडी गमावल्यानंतर संघर्ष करत होता. त्यानंतर सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आलेले अनुज रावत आणि दिनेश कार्तिक आरसीबीसाठी ट्रबलशूटर ठरले. दोघांमध्ये ९५ धावांची भागीदारी झाली. अनुज रावतने २५ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सीएसकेचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक धोनीने त्याला धावबाद केले. त्याचवेळी, दिनेश कार्तिकने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३८ धावा काढल्या. या सामन्यात तो नाबाद राहिला. मुस्तफिझूर रहमान सीएसकेसाठी सर्वोत्तम ठरला. त्याने दोन षटकांत चार बळी घेतले. याशिवाय दीपक चहरला यश मिळाले.

शनिवारी पंजाब विरुद्ध दिल्ली यांचा सामना दुपारी ३:३० वाजता तर कोलकाता विरुद्ध हैदराबाद याचा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा