ग्राम पंचायत निवडणूक भत्ता द्या – प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर
ओरोस
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये निवडणूक कर्मचारी यांना निवडणूक भत्ता मिळाला नसल्याचे प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग ने ७ मार्च २०२३, १५ मे २०२३ व ७ नोव्हेंबर २०२३ च्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले होते. तसेच शासन परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना निवडणूक भत्ता अदा करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. परंतु याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये काम केलेल्या निवडणूककर्मचारी यांना निवडणूक भत्ता मिळावा अशी आग्रही मागणी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षणाचे कामकाज शिक्षकांच्याकडे देण्यात आले होते. शिक्षकांनी हे कामकाज अतिशय कमी कालावधीत उत्कृष्टरित्या केले आहे. या कामासाठी प्रगणक, पर्यवेक्षक म्हणून काम केलेल्या शिक्षकांचे १० हजार रुपये मानधन अद्यापही शिक्षकांना मिळाले नाही. प्रगणक, पर्यवेक्षक यांना सर्वेक्षणासाठी सरसकट १० हजार रुपये व प्रशिक्षणासाठी ५०० रुपये अशा निर्णयाचे परिपत्रक राज्य मागासवर्ग आयोग यांचेकडून निघाले आहे. सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर शिक्षकांनी पूर्ण केले आहे. मात्र सर्वेक्षणानंतर दोन महिने होऊनही मानधन देण्यासाठी आपणाकडून कोणतीही हालचाल अद्याप झाली नाही. तरी सदर सर्वेक्षण केलेल्या शिक्षकांना सरसकट १० हजार रुपये मानधन व ५०० रुपये प्रशिक्षणासाठी तात्काळ देण्याची कार्यवाही करावी. यासाठी निवासी उपजिल्हाधीकारी याची भेट घेऊन अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, जिल्हा सरचिटणीस अरुण पवार, कोषाध्यक्ष रविंद्र देसाई, जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन पाटील मालवण तालुका अध्यक्ष दिनकर शिरवलकर, मालवण तालुका सचिव कृष्णा कालकुंद्रिकर, कुडाळ तालुका अध्यक्ष विनेश जाधव तसेच शिक्षक भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.