You are currently viewing बदलणारी ‘ती’ आणि तिचे आरोग्य

बदलणारी ‘ती’ आणि तिचे आरोग्य

*जिल्हा परिषद पूर्ण प्राथ. शाळा पाट – आंदुर्लेच्या शिक्षिका श्रीमती पल्लवी साईल लिखित अप्रतिम लेख*

 

*बदलणारी ‘ ती ‘ आणि तिचे आरोग्य* 

 

‘ ती ‘ बदलत आहे.. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री प्रत्येक क्षेत्रात आज नाव कमावत आहे. पूर्वीची चूल आणि मूल सांभाळणारी ‘ती ‘ आज देश सांभाळण्यासाठी सक्षम बनली आहे. ही ‘ती ‘ म्हणजे फक्त स्त्री किंवा नारी किंवा महिला अशा एका मानवी प्रकारात बंदिस्त करण्याचा जीव नाही. स्त्रीला मुलगी, आई, बहीण, मावशी, काकी, वहिनी, आजी, सासू, भावजय, नणंद, मैत्रीण, पत्नी, नोकरी करणारी, सेवा करणारी, अधिकारी अशा अनेक नात्यांच्या कॅलिडोस्कोप मधून पहावयाची मानसिकता समाजात अगदी खोल व रुजली आहे. पण खरंच ‘ ती ‘ स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत सक्षम बनली आहे का? बदलत्या आणि विकसित होत जाणाऱ्या जीवनशैलीमध्ये स्त्रीचे आरोग्य सुद्धा विकसित झाले आहे का? या प्रश्नांची उत्तरे सदर निबंधातून मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.

” विवेक पडतो गहाण,

पाण्यात राहूनही मग माशाची भागत नाही तहान

स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप,

वाटीने ओतलं तरी कमी पडतं तूप

आयुष्याच्या संध्याकाळी मग

एकदम जाणव लागतं काही

धावण्याच्या हट्टा पायी आपण श्वासच मुळी घेतला नाही! ”

वरील कवितेच्या ओळी खरंतर स्त्री-पुरुष सर्वांनाच लागू पडतात. माणूस हा बुद्धिमान प्राणी.. पण काळाच्या ओघात माणूस बुद्धीच्या जोरावर प्रगती करण्यात इतका तल्लीन झाला की ज्यासाठी हे सर्व करतो, त्या आरोग्यदायी सुख शांतीने समृद्ध अशा जीवनाची शाश्वती ठरवून बसला, आता बाईचा जन्म म्हणजे या सगळ्यात धगधगते कुंड!!

‘ मी नंतर आधी इतरांची काळजी घ्यायची’- हे बाळकडू तर आपल्या देशात लहानपणापासूनच मुलीला पाजले जाते. स्त्री म्हणजे सोशिकता! स्त्री म्हणजे कारुण्य! अशी लेबले लावल्यामुळे आरोग्याचे महत्त्व जरी पटले तरी प्रत्यक्षात अमलात आणणाऱ्या स्त्रिया फार म्हणजे फार कमी आढळतात. त्यातही जर एखादी स्त्री स्वतःची उत्तम काळजी घेत असेल, आरोग्याच्या बाबतीत जागरूक असेल तर तिच्या आसपासच्या स्त्रियाच यावरून तिला नावे ठेवतील. तिची हेटाळणी करतील.

आरोग्य सुस्थितीत असेल तर सारे काही सुरळीत –

आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक प्रकृती ठणठणीत, कधीच गोळ्या घेतल्या नाही, आजारी पडले नाही- असे नव्हे. शारीरिक,भावनिक, मानसिक या तिन्ही पातळ्यांवर आरोग्य संपन्न असणे फार महत्त्वाचे आहे. मैत्रिणींनो, तुम्ही सध्याचा काळ काही क्षण थांबून अधोरेखित केला आहे का? केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की या यांत्रिक काळात आपण यंत्राच्या तालावर अक्षरशः पळतोय. दिवस कधी उगवतो आणि मावळतो याचा थांब पत्ताच लागत नाही. असं वाटतं घड्याळे, मोबाईल, वाहने हे त्यांच्या इशाऱ्यावर आपल्याला जणू नाचवत आहेत. या धावपळीत स्वतःचे आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतः मधील शारीरिक बदल लगेच लक्षात येतात. पण मानसिक बदल असे लगेच लक्षात येत नाही. मग मानसी अस्वास्थ्यातून जन्माला येणारे नैराश्य, औदासिन्य, एकाकीपणा, निद्रानाश, विस्मृती असे अनेक बिघाड कमी अधिक प्रमाणात आपल्या आयुष्यात डोकावत जातात.

पण घाबरून जाण्याचीही गरज अजिबात नाही बरं का! कारण मानसिक स्वास्थ्य किती महत्त्वाचे आहे याबाबत समाजात आता बऱ्यापैकी जागृती होताना दिसत आहे. सोशल मीडियाचा चांगला उपयोग अनेक सेलिब्रिटी यासाठी करताना दिसून येतात.

प्रसिद्धीच्या वलयाची किमया न्यारी –

तामिळनाडूच्या व्ही. श्रीपथी या महिलेच नाव कदाचित तुम्ही पहिल्यांदाच आता वाचत असाल. पण या महिलेच्या शारीरिक भावनिक आणि मानसिक सुदृढतेचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे.. प्रसूतीनंतर अवघ्या दोन दिवसात 250 किलोमीटर अंतर प्रवास करून, परीक्षा देऊन, त्यात यशस्वी होत वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी या महिलेने देशातील पहिली आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश होण्याचा मान मिळवला. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या पहिल्या महिला अध्यक्ष बनण्याचा मान मिळवणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य यांनी महिला दिनानिमित्त बँकेच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. अशा प्रेरणादायी बातम्या वाचताना कधी कधी सवंग प्रसिद्धीसाठी स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या बातम्या मन अस्वस्थ करतात. अलीकडेच स्वतःला कर्करोग झाल्याचे भासवून स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियाद्वारे पसरवणारी सेलिब्रिटी पूनम पांडे हीचे नाव मात्र चांगले गाजले.असो.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा संकल्प करूया. इतरांची काळजी घेण्यासाठी आधी स्वतः सुदृढ राहिले पाहिजे यासाठी आरोग्य देवतेची उपासना करूया.

 

• श्रीमती पल्लवी अर्जुन साईल

• जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाट – आंदुर्ले

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + one =