You are currently viewing अवैध खैरवाहतुक करणाऱ्या तीन आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी

अवैध खैरवाहतुक करणाऱ्या तीन आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी

वनविभाग फिरतेपथक सावंतवाडी टीमची कारवाई

 

सावंतवाडी :

दोडामार्ग-बांदा मार्गाने खैराची तोड करून अवैध वाहतूक करणाऱ्या तीन संशयिताना त्याच्या चारचाकी वाहनसह सावंतवाडी वन विभागाच्या फिरत्या पथकाने ताब्यात घेतले. सदर संशयित आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही दोन दिवसांची वन कोठडी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडीचे सहाय्यक वनसंरक्षक सुनिल लाड यांचे नेतृत्वाखाली सावंतवाडी फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल मधुकर काशिद, पोलिस हवालदार गौरेश नाईक, वनरक्षक प्रमोद जगताप यांच्या गस्ती पथकाने दोडामार्ग-बांदा रस्त्यावर रात्रगस्त घालत असताना जांभळ्या रंगाची ओमनी वाहन क्रमांक (जीए ०५ बी ३५२४ ) हे वाहन संशयास्पदरित्या लाकडांच्या नगांची वाहतूक करीत असल्याचे जाणवले. त्यानुसार सदर वाहनाचा पाठलाग करून पानवळ येथे सदरच्या वाहनाला थांबविण्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये खैर प्रजातीचे ८ मोठे नग, बॅटरी ऑपरेटेड दोन कटर मशीन, पाळ इत्यादी झाडतोडीचे साहित्य दिसून आले.

त्यामुळे या साहित्यासह वाहनातून अवैध खैरवाहतूक करीत आलेल्या गंगाराम रामा कोकरे, (वय- ३७ वर्षे, रा.निरवडे, ता.सावंतवाडी ), बाबूराव भागू कोकरे, (वय- ५० वर्षे, रा.निरवडे, ता.सावंतवाडी ) व अनिल विठ्ठल झोरे, (वय- २७ वर्षे, रा.डिगस, ता.कुडाळ ) या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम- १९२७ चे कलम – ४१ (२)(ब), कलम- ४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तिन्ही आरोपींना आज दुपारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, गुन्हयाचे गांभीर्य पाहून आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयामध्ये संशयितांची बाजू ॲड. नीता गावडे यांनी मांडली तर वन विभागाच्या वतीने फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी प्रभाविपणे बाजू मांडली.

ही कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी एस.नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल मधुकर काशिद, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप यांच्या पथकाने पार पाडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − five =