You are currently viewing आयुष्य एक प्रवास

आयुष्य एक प्रवास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*आयुष्य एक प्रवास* 

 

आयुष्य.. ! तसं पाहिलं तर आयुष्य हा एक प्रवासच असतो. प्रत्येक व्यक्तीला तो करावाच लागतो. अगदी लहानपणापासूनचा हा प्रवास अगदी स्वतःच्या नकळत येणाऱ्या प्रत्येक दिवसा बरोबर करावा लागतो.. तसे पाहायला गेलं तर आयुष्याच्या प्रवासाचं वर्णन करणं सोपं नाही. प्रत्येकाचेच आयुष्य वेगळे असते आयुष्याचा प्रवासही वेगवेगळाच म्हणायचा.. माझं ही तसंच समजा… छोटा का होईना?..

ह्या प्रवासात वेगवेगळी वळणे येत असतात पण ह्या प्रवासाची खरी गमंत म्हणजे प्रत्येकाचाच प्रवास हा अगदी भिन्न असतो. काहींसाठी हा प्रवास खडतर तर काहींसाठी खूप मजेशीर असतो. काहींना ह्या प्रवासाचा हेवा वाटतो तर काहींना तो नकोसा वाटतो. पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा ह्या प्रवासात नवीन वाटा येतात.. अनोळखी वाटा एकत्र होतात नवीन व्यक्ती येतात आणि एकाच वाटेने प्रवास करत आपल्याला सोबत करतात.. तसं म्हटलं तर आयुष्याचा प्रवास हा एकट्याचाच.. तरीही विधात्याने त्यात रंजकता आणावी म्हणून पेरलेली असते ती सोबत

प्रत्येक वळणावर प्रवासाला वेगळा अर्थ अन् दिशा देण्यासाठी..

आयुष्य हळू हळू चालत राहणार, एका वेगळ्या वळणावर असणार, कधी अमावसेच्या रात्री सारखं अंधारमय असणार तर कधी पौर्णिमेच्या चंद्रासारखं कलेकलेनी वाढणार.. कधी श्रावणसरी सारखं रिमझिम सुखद बरसणार..तर कधी चैत्रातल्या कडक उन्हासारखं पोळणारं…आयुष्य कुणासाठीच न थांबणार सतत पुढे जात राहणारं.. आयुष्य प्रत्येक पावलावर नवं काही शिकविणार, अनुभवाचे धडे देणार आणि आठवणीची शिदोरी देणार आयुष्य.. हेच आयुष्य पावला पावलावर जगणं शिकवणार… मात्रं हा प्रवास करताना माणसाला खूप काही शिकायला मिळतं.. नव-नवीन गोष्टींची अनुभूती होते आणि असचं आयुष्याचा एक एक टप्पा गाठत माणूस आयुष्यात पुढे पुढे जात असतो…कुठेतरी आपण सगळेचजण आपल्या पाठीवरती वा मनावरती आयुष्याच ओझं घेऊन प्रवास करत असतो तरी पण कुठल्यातरी वळणावर असं वाटून जातं की हा आयुष्याचा प्रवास आपण एकटे सहजपणे पूर्ण करू शकतो ? पण बारीक विचार केला तर खरंच असं होऊ शकतं का..? एकट्यानं हा आयुष्याचा प्रवास पूर्ण होऊ शकतो का ? आणि झालाच तर तो प्रवास आपल्या मनाला आनंद देणारा ठरू शकतो का..? असे कितीतरी प्रश्न.. उत्तर मात्र अनुत्तरीत… मग मात्र कुठेतरी असही वाटू लागतं की आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येकालाच एका जोडीदाराची गरज असते नाही का ? परमेश्वरानं बनवलेल्या या सुंदर कलाकृतीने दोघेही एकमेकांशिवाय अपूर्णच.. असो मनावरच्या ओझ्यांबद्दल बोलायचंच झालं तर काहींना भूतकाळात केलेल्या चुकांचं ओझं, काहींना जबाबदारीच ओझं, काहींना तुटलेल्या स्वप्नाचं ओझं तर काहींना भाविष्यकाळातली स्वप्न पूर्ण करण्याचं ओझं… काहींना इतरांच्या अपेक्षांचं ओझं तर काहींना स्वतःच निर्माण केलेल्या अपेक्षांचं ओझं .

पण या ओझ्यांची गंमत अशी असते की आपण जर एकटेच हे ओझे वाहत निघालो तर या ओझ्याचं वजन जड वाटायला लागतं पण जर कोणी सोबती या प्रवासात बरोबर मिळाला तर हेच ओझं हळू हळू जाणवेनासं होतं आणि बघता बघता हाच खडतर वाटणारा आयुष्याचा प्रवास एकदम सोपा होऊन जातो.. सोपा वाटायलाही लागतो… आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येकालाच असा साथीदार मिळेल असं मात्र नाही. काही नशीबवान लोकांना सहज मिळून जातो तर काहींना मात्र बऱाच काळ वाट पाहावी लागते.. या आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत साथ देणारा साथीदार ज्याला मिळतो ना त्याला नशीबवान म्हणावे लागेल आणि अजूनही ज्याच्या आयुष्यात असा साथीदार कोणी आला नसेल तर विश्वास ठेवा की कुठल्यातरी वळणावरती नकळतपणे कोठून तरी आयुष्याच्या रस्त्याला तो नक्कीच येऊन मिळेल तोपर्यंत एकट्यानं का होईना हा आयुष्याचा प्रवास चालू मात्र ठेवावा हं…. म्हणतात ना आयुष्य हे एक रेसचे मैदान आहे इथे घोडे ही आपलेच आणि सवारीही आपलीच… जिंकलो तरी आनंद आणि हरलो तरीही आनंदच…

काहीजण हा आयुष्य -प्रवास करायचा म्हणून करतात तर काहीजण ह्या प्रवासाचा मनापासून आनंद घेत असतात.. टप्प्याटप्प्याने काळा सोबत पुढे सरसावणारा हा प्रवास कधी वेग पकडतो कळतच नाही.. पापण्यांची उघडझाप झाली आणि त्या एका क्षणात पूर्ण आयुष्य सरले असे वाटायला लागते मग असे वाटते की आपण ह्या संपूर्ण प्रवासात जगायचेच विसरलो… आयुष्य जगलोच नाही.. आपल्या खूप इच्छा, आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतात. खूप प्रश्नांची उत्तरं मिळायची बाकी राहिलेली असतात, खूप साऱ्या गोष्टी गुपित बनून राहतात.. मग या थोड्या वेळात खूप जगावं वाटायला लागतं अगदी काळाचं चक्र उलट फिरवून मागे परतावेसे वाटते आणि पुन्हा एकदा भरभरून जगावेसे वाटू लागते अर्थातच प्रवासाच्या या अंतिम टप्प्यावर आल्यावर मात्र ते अशक्य असत… पण एक गोष्ट शक्य आहे ती म्हणजे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असताना येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचे ठरवले कि आयुष्य हे नक्कीच सुंदर वाटतं आयुष्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यातील प्रत्येक सुंदर गोष्टींचा आस्वाद घेत जगलं कि आयुष्य हे खूप सुंदर बनतं…

प्रवासातली ती वळणे, आणि वळणांवरचा तो प्रवास.. सहसा आठवणीतून मिटला जात नाही..

कारण तिथल्या काही पाऊलखुणा,

प्रवास संपला तरी सहसा पुसल्या जात नाहीत..

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे @

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा