वाचन संस्कृती वाढीसाठी श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा, मालवणची अभिनव योजना.
आचरा :
अलीकडे ग्रंथालयात जाऊन वाचन संस्कृती जोपसण्याची आवड सर्व आबालवृद्धांवर कमी कमी होत चाललेली आहे. ३५ वयोगटाच्या आतील तरुण वाचनालयाकडे क्वचीतच भेट देताना दिसतात. केवळ एका वाचनालयाची ही समस्या नसून सर्व ग्रंथालयांची हीच प्रमुख समस्या आहे. त्यावर एक उपाय योजना म्हणून श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरे, ता-मालवण, या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या वाचन मंदिराने ही महाराष्ट्राला मार्गदर्शक करणारी अभिनव योजना अलीकडेच सुरु केली आहे. त्याचा शुभारंभ नुकताच श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरे येथे बाबाजी गोपाळ भिसळे, (अध्यक्ष )श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा यांच्या हस्ते ग्रंथपूजन आणि दिपप्रज्वलनाणे झाला. यावेळी अर्जुन बापर्डेकर ( कार्यवाह ) अशोक कांबळी (उपाध्यक्ष) सुरेश शामराव ठाकूर (अध्यक्ष) कोकण मराठी साहित्य परिषद शाखा -मालवण, वाचनालय कार्यकारिणी सदस्य व सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विनिता कांबळी(ग्रंथपाल ) म्हणाल्या ‘तरुण वर्ग वाचनालयाकडे आकर्षित होण्यासाठी त्यांचे पालकत्व घेऊन त्यांना वाचनाची ओढ निर्माण केली पाहिजे आणि म्हणूनच आमचे काही महाविदयालयातील निवडक विद्यार्थ्यांना निवडून त्यांचे पालकत्व वाचनालयाचे कार्यकारिणी व सांस्कृतिक समिती सदस्य यांच्याकडे द्यावे ही संकल्पना मला सुचली. दक्ष दत्तक पालकांनी तरुण वाचकांशी सदैव संपर्क ठेवून त्यांना सकस आणि समृद्ध वाचनासाठी नेहमी प्रवृत्त केले तर ही योजना १०० टक्के यशस्वी होईल.’ सदर योजनेला शुभेच्छा देताना बाबाजी भिसळे म्हणाले ‘ही अभिनव योजना महाराष्ट्रात आमचे ग्रंथालय सुरु करीत आहे, त्याचा मला अभिमान वाटत आहे.’ तर अर्जुन बापर्डेकर म्हणाले ‘दिव्याने दिवा पेटतो त्याच पद्धतीने आम्ही दत्तक पालक प्रथम २५ वाचकांना दत्तक घेऊन त्यांच्या प्रगतीच्या आढाव्याच्या नोंदी वाचनालयात ठेवणार आहोत. जेणेकरून अन्य वाचनालयांना ही योजना सुरु करायची असल्यास ती माहिती मिळू शकेल.’ अशोक कांबळी म्हणाले ‘तरुण वाचक मोबाईल वरून पुन्हा पुस्तकाकडे वळण्यासाठी दत्तक वाचक पालक योजना खरोखरच मार्गदर्शक ठरेल’ तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सुरेश ठाकूर म्हणाले ‘तरुण पिढीच्या व्यासंगाचा,चिंतनाचा, विस्तृत परीघ पुस्तकाच्या पानापानातून वाढत जाणारा आहे. तरुणांना लेखन, वाचन, विनोद, आध्यात्म, विज्ञान, अशा नानाविध विषयांची गोडी मोबाईल पेक्षा ग्रंथ लावणार आहेत आणि म्हणूनच ही केवळ रामेश्वर वाचन मंदिर आचरेची योजना न राहता महाराष्ट्र शासनाने सर्व ग्रंथालयात ही योजना राबवावी.’ यावेळी वाचक दत्तक पालक म्हणून पदाधिकाऱ्यांसमवेत उर्मिला सांबारी, वैशाली सांबारी,दीपाली कावले,कामिनी ढेकणे,वर्षा सांबारी,भावना मुणगेकर, विलास आचरेकर यांनी पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली. यावेळी संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, सांस्कृतिक समिती सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.