*महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी डॉ. कैलास कदम तर सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते यांची निवड!*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
कामगार चळवळीत मानाचे ठरलेल्या महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी डॉ. कैलास कदम यांची तर सरचिटणीसपदी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची आज (१९ मार्च) सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्रात इंटकचे यापूर्वीचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांच्या निधनानंतर गेली दोन वर्षे दोन्हीही नेते प्रभारी नेतृत्व म्हणून महाराष्ट्र इंटकवर कार्यरत होते. पुढे या ना त्या कारणाने ही निवडणूक झाली नव्हती. पण केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी उपाध्यक्ष चंद्रप्रसाद सिंग यांना निरिक्षक म्हणून पाठवून त्यांच्या देखरेखीखाली फोर्ट येथील डॉ. सर जीवनजी मोदी सभागृहात बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपस्थित ४४ कामगार संघटनांच्या १३३ सदस्यांनी सदर निवडीच्या ठरावाला एकमताने मंजूरी दिली. या निवडीचे खचाखच भरलेल्या सभागृहाने मोठ्या जल्लोषात स्वागत केले. दुसर्या ठरावाद्वारे महाराष्ट्र इंटकच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्याचे सर्वाधिकार सभेने अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना दिले आहेत.
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. कैलास कदम गेली १९ वर्षे इंटकमध्ये कार्यरत असून, पुण्यातील हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून अनेक कामगार संघटनांचे नेतृत्व करित आहेत.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते गेल्या ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ संघात कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणून राज्यात विविध कामगार संघटनेचे, अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या खांद्याला खांदा देत कामगारांचे प्रश्न सोडवित आहेत. केंद्रीय इंटकच्या कार्यकारिणीवरही ते कार्यरत आहेत.
केंद्र सरकारने “फोर कोड बिल” आणून कामगार आणि कामगार चळवळीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला आहे, त्या विरुद्ध कणखरपणे लढण्याचा निर्धार दोन्हीही नेत्यांनी केला आहे. घरेलू कामगार, आशा कामगार, अंगणवाडी, बांधकाम कामगार अशा अनेक असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करताना इंटकची ताकद वाढविण्याचा नवनिर्वाचित नेतृत्वाने संकल्प केला आहे. या निवडीचे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कामगार संघटनांद्वारे स्वागत होत आहे.