आशा स्वयंसेविकांना मिळणार स्मार्टफोन
कणकवली / प्रतिनिधी :-
राज्यात आरोग्यविषयक विविध योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात महत्वाचा सहभाग असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवतक यांच्यासाठी आता स्मार्ट मोबाईल फोन खरेदी करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.
ग्रामीण भागात अशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यातून आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. त्यात आवश्यकतेनुसार योग्य त्या उपाययोजना करणे शक्य होणार आहे. याचाच एक भाग म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट मोबाइल फोन खरेदी करण्यात येणार आहे.
राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी ४५ हजार ७८३ स्मार्ट मोबाइल फोन खरेदी करण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे. त्यासाठी लागणाऱ्या ३६ कोटी ६२ लाख ६४ हजार इतक्या रुपयांची तरतूद करण्यासाठी मान्यता घेण्यात आली आहे.