You are currently viewing गजानन विजय ग्रंथ

गजानन विजय ग्रंथ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

 

अध्याय पहिला —

*गजानन विजय ग्रंथ*

 

माघ वद्य सप्तमीस

प्रगटले शेगावीस

अवलिया गजानन

जनहित साधण्यास ||

 

तपोबल मुखी दिसे

दृष्टी नासाग्रासी वसे

निजानंदी रंगलेला

अलौकिक संत असे ||

 

दामोदर नि बंकट

पाही प्रथम योग्यास

चित्ती संतोष पावता

हात जोडी वंदनास ||

 

उष्ट्या पत्रावळीतून

शिते वेची दयाघन

सांगे अन्न‌ परब्रह्म

नित्य ठेवा आठवण ||

 

देवीदास विप्राने हो

ताट वाढूनी आणिले

कालविले सर्व अन्न

मुखी कवळ सेविले ||

 

पाणी पिऊन हाळाचे

वदे ब्रह्म चराचरी

सर्व रूपे ईशाचीच

गांठ बांधावी अंतरी ||

 

पहिल्याच अध्यायासी

दिली छान शिकवण

समर्थांनी सांगितले

नित्य स्मरावे आपण ||

 

©️®️

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा