वैभववाडीत ‘जाणता राजा’ महानाट्याचा शानदार शुभारंभ
जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची प्रमुख उपस्थिती
पहिल्या दिवशी महानाट्य पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी
प्रेक्षकांना उद्या आणि परवा देखील मोफत पाहता येणार हे महानाट्य
वैभववाडी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित जाणता राजा या महानाट्य प्रयोगाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत नाधवडे येथे पार पडला. जाणता राजा महानाट्य पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक व इतिहास प्रेमींनी पहील्या दिवशी मोठी गर्दी केली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध करण्यात आले आहे. या महानाट्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून पूर्णतः मोफत आहे. दि. १९ व २० मार्च ला देखील जाणता राजा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
वैभववाडी तालुक्यात पहिल्यांदाच जाणता राजा महानाट्य सादर होत आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांना विनामूल्य (मोफत) हे महानाटक पाहण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. नाधवडे महादेव मंदिर नजीकच्या भव्य पटांगणावर १९ व २० रोजी देखील सायंकाळी ६.३० वा. ते रात्री १० या वेळेत हे महानाट्य रसिक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ११९३ वा जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग याठिकाणी सादर होत आहे. जाणता राजा या नाटकामध्ये जवळपास १५० कलाकार सहभागी झाले आहेत. घोडे, उंट यांचा देखील या नाटकात समावेश आहे.
प्रशासनाकडून नाटक स्थळी वेळेत पोहचण्यासाठी मंगळवार व बुधवारी देखील एस. टी. सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कणकवली, देवगड तसेच अन्य तालुक्यातून एसटी सेवा देण्यात येणार आहे. वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांतून देखील एसटी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाधवडे येथे कार्यक्रमस्थळी सात ते आठ हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. बचत गटांसाठी स्टाॅल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे.
जाणता राजा या महानाट्याचे आयोजन करुन सदर नाटक पाहण्याची तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सुवर्णसंधी उपलब्ध करून शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. १९ व २० मार्च रोजी देखील या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.