नेर्ले वासियांना आ. नितेश राणे यांनी दिला शब्द.
वैभववाडी
ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क समस्या दिवसेंदिवस सर्वांना त्रासदायक ठरत आहे. सर्वांगीण विकासाबरोबर गावात मोबाईल टॉवर उभारण्याची जबाबदारीही लोकप्रतिनिधींची आहे. तुम्ही जागा निश्चित करा, मी टॉवर देतो. असे अभिवचन कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी नेर्ले वासियांना दिले आहे. विद्यमान खासदार विनायक राऊत हे बीएसएनएल टॉवरची उद्घाटने करत सुटले आहेत. परंतु त्यांनी उद्घाटने केलेल्या एकाही टॉवरला नेटवर्क नाही असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.
मुख्यमंत्री ग्राम सडक मधून मंजूर असलेल्या नेर्ले – हातदे या मुख्य रस्ता कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा चिटणीस भालचंद्र साठे, आप्पासाहेब खानविलकर, उपसभापती दुर्वा खानविलकर, शक्ती प्रमुख पप्पू इंदुलकर, स्वप्नील खानविलकर, अरविंद पांचाळ व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. नितेश राणे म्हणाले, विविध ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी विरोधक आता डोके वर काढत आहेत. विकास आम्हीच करत असल्याचे ते भासवत आहेत. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. या तालुक्याचा आमदार मी आहे. विकास कामे ही माझ्या शिफारशीने होणार आहेत. आम्ही दुसऱ्याचे कामाचे श्रेय कधीच घेणार नाही. आदरणीय माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी आम्हाला चांगली शिकवण दिली आहे.
जबाबदारीने सांगतो रस्ता प्रश्न मार्गी लागण्यासाठी आंदोलन तुम्हाला करावे लागणार नाही. विकासकामे मार्गी लावण्यासाठी तुमचा आमदार सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क ही देखील मूलभूत गरज बनली आहे. नेर्ले गावात लवकरच जिओ मोबाईल टॉवर उभारणार असल्याचे आश्वासन आ. नितेश राणे यांनी दिले. भालचंद्र साठे म्हणाले, तालुक्यातील रस्ते दुरावस्थेला सत्ताधारी जबाबदार आहेत. निद्रीस्त राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उगारावे लागणार आहे. त्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. सेना पदाधिकारी विकास कामाच्या बाबतीत दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पप्पू इंदुलकर स्वप्नील खानविलकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने नेर्ले ग्रामस्थ, सुतारवाडीतील ग्रामस्थ व महिला, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.