*रोमहर्षक लढतीमध्ये दिल्लीचा तीन चेंडू राखून केला पराभव*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) ने रविवारी महिला प्रीमियर लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात ११३ धावा केल्या. आरसीबीने १९.३ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद असून त्यांनी घरच्या मैदानावर दिल्लीचा पराभव केला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना झाला. बंगळुरूच्या पुरुष संघाने कधीही आयपीएल चषक जिंकला नाही, परंतु महिला संघाने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात विजय मिळवला. विशेष म्हणजे दिल्ली आणि बेंगळुरू यांच्यात या लीगमध्ये आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले गेले आहेत आणि बंगळुरूने प्रथमच विजय मिळवला आहे आणि तोही अंतिम सामन्यात.
११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला सोफी डिव्हाईन आणि स्मृती मनधना यांनी चांगली सुरुवात करून दिली आणि दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. ही भागीदारी शिखा पांडेने ३२ धावा करणाऱ्या डिव्हाईनला बाद करून भेदली. यानंतर कर्णधार मनधनाने डावाची धुरा सांभाळली, मात्र मिन्नू मणीने तिला ३१ धावांवर तंबूमध्ये पाठवले. त्यानंतर एलिस पेरी आणि रिचा घोष यांनी अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात बंगळुरूला पाच धावांची गरज होती. अरुंधती रेड्डी गोलंदाजीला आली, तेव्हा रिचा स्ट्राइकवर होती. पहिल्या चेंडूवर तिने एक धाव घेतली. त्याचवेळी पेरीने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. रिचाने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. पेरी ३५ धावांवर नाबाद राहिली आणि रिचा १७ धावांवर नाबाद राहिली. दिल्लीकडून शिखा आणि मिन्नूला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, श्रेयंका पाटील आणि मोलिनक्सच्या शानदार गोलंदाजीमुळे आरसीबीने दिल्लीचा डाव १८.३ षटकांत ११३ धावांत गुंडाळला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीच्या संघाला शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळ करत आरसीबीच्या गोलंदाजांवर दडपण आणले, मात्र आठवे षटक टाकण्यासाठी आलेल्या डावखुर्या फिरकी गोलंदाज मोलिनक्सने या षटकात शेफाली, कॅप्सी आणि जेमिमाला बाद करून दिल्लीचा डावाला सुरुंग लावला.
शेफालीने २७ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. यानंतर श्रेयंका पाटीलने दिल्लीच्या फलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही. दिल्लीची अवस्था इतकी खराब झाली होती की, एकेकाळी बिनबाद ६४ धावा करणारा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि १८.३ षटकांत ११३ धावांवर आटोपला.
आरसीबीतर्फे श्रेयंका पाटीलने चार, मोलिनक्सने तीन आणि आशाने दोन गडी बाद केले. विशेष म्हणजे आरसीबीच्या फिरकीपटूंनी नऊ विकेट घेतल्या तर राधा यादव धावबाद झाली. लॅनिंगने २३ धावा केल्या, रॉड्रिग्ज आणि कॅप्सीला खातेही उघडता आले नाही. कॅप आठ धावा, जोनासेन तीन धावा, राधा १२ धावा, मिन्नू पाच धावा, अरुंधती १० धावा केल्यानंतर बाद झाल्या. तानियाला खातेही उघडता आले नाही, तर शिखा पाच धावा करून नाबाद राहिली.
सोफी मोलिनक्स ही सामनावीर ठरली. जॉर्जिया वेअरहॅमने इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सीझनचा पुरस्कार जिंकला. श्रेयंका पाटीलला हंगामातील उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. फेअरप्ले पुरस्कार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या स्मृती मनधनाने स्वीकारले. संजीवन सजनाने कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार पटकावला आहे. जेमिमा रॉड्रिग्सने तिच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. श्रेयंका पाटीलने १३ विकेट्स घेऊन हंगामातील पर्पल कॅप जिंकली. तर एलिस पेरी ऑरेंज कॅपची विजेती ठरली आहे. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर अवॉर्ड दीप्ती शर्माला देण्यात आला.
इंडिअन प्रिमियर लिगच्या पुरूषांच्या स्पर्धेला शुक्रवार २२ मार्चपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई आणि आरसीबी यांच्यात चेन्नई येथे रंगणार आहे.