You are currently viewing दैव जाणिले कुणी

दैव जाणिले कुणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*दैव जाणिले कुणी*

 

*स्रियस्य चरितं पुरुषस्य भाग्यम्*

*देवो न जानति*

*कुतो मनुष्य:*

 

हा श्लोक महाभारतातून घेतलेला आहे. हा पूर्ण श्लोक असा आहे की,

 

। नृपस्य चित्तं कृपणस्य वित्तम्

मनोरथा: दुर्जनमानवानाम्

त्रिया चरित्रं पुरुषस्य भाग्यम्

देवो न जानति कुतो मनुष्य:।।

 

राजाचे मन, कंजुषाचे धन, दुर्जनाचे मनोरथ, स्त्रीचे चरित्र आणि पुरुषाचे भाग्य हे दैवाला सुद्धा जाणता आले नाही ते सामान्य मनुष्याला कसे काय उमगणार?

 

खरं आहे! एक सामान्य बुद्धीची व्यक्ती म्हणून मी जेव्हां जेव्हां रामायण, महाभारत आणि इतर अनेक ऐकलेल्या दंतकथांबद्दल विचार करते तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. तेव्हाही राहत होते आणि आजही तेच तेच प्रश्न मला पुन्हा पुन्हा पडतात.

अशा अनेक स्त्रिया ज्या मनावर स्वार आहेत..

आंधळ्या पतीसाठी आयुष्यभर डोळस असूनही डोळ्यावर पट्टी बांधून जगणारी गांधारी… हिला पतिव्रता म्हणायचं की जर ही धृतराष्ट्राचे डोळे बनून जगली असती तर वेगळे महाभारत घडू शकले असते का? पांडव आणि कौरवातले केवळ राज्यपदासाठीचे वैर मिटवता आले असते का? कुरुक्षेत्रावरचं ते भयाण युद्ध टळलं असतं का?असा विचार करायचा?

कुंती सारख्या महाराणीला जन्मभर दुर्वास ऋषीच्या क्रोधित शापवाणीमुळे लाभलेलं शापित मातृत्व का भोगावे लागले?

द्रौपदीने पाच पांडवांचं पत्नीपद कसं निभवलं असेल? नक्की कुणाशी ती मनोमन बांधली गेली होती? युधीष्ठीराबद्दल तिच्या मनात नक्कीच वैषम्य असणार आणि भीमाबद्दल आस्था. समान भावनेने पंचपतींचा तिने मनोमन स्विकार केला असेल का?

वृषालीने मनोमन कर्णावरच प्रेम केले. त्यावेळेच्या परिस्थितीनुसार कर्णाला दुसऱ्या स्त्रीशी विवाह करावा लागला तरीही वृषालीने पती म्हणून फक्त कर्णाचाच विचार मनात बाळगला.

अहिल्या चा कोणता दोष होता की, गौतमी ऋषीने केवळ त्यांच्या कुटीच्या वाटेवरून जाताना इंद्राला पाहिले आणि अहिल्यावर व्यभिचाराचा आरोप ठेवून तिचे शापवाणीने पाषाणात रूपांतर केले आणि त्याच अहिल्येचा कालांतराने रामाने उद्धार केला.

मीरा, राधा यांना आपण नक्की कोणत्या रूपात पाहतो? प्रेमिका की भक्तिणी की समर्पिता?

रामाबरोबर वनवासात गेलेल्या सीतेला एखाद्या सामान्य स्त्री सारखा कांचन मृगाचा लोभ का व्हावा?

रावणासारख्या असुराची पत्नी मंदोदरी साठी आपल्या मनात नक्कीच एक हळवा कोपरा आहे. वालीची पत्नी तारा ही सुद्धा एक राजकारणी चतुर स्त्री म्हणूनच आपल्या मनात का राहते?

। अहल्या द्रौपदी तारा कुंती मंदोदरी पंचकन्या स्मरेत नित्यम

महा पातक नाशनम्।।

हा श्लोक म्हणताना खरोखरच जाणवते की कोणत्याही कारणामुळे असेल, त्या त्या काळाच्या परिस्थितीमुळे असेल पण कुठला ना कुठला कलंक चारित्र्यावर घेऊन जगणाऱ्या या स्त्रियांना काळानेच दैवत्व कसे दिले?

हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. आणि म्हणूनच स्त्रीच्या चारित्र्याविषयी नेमकं काही ठरवताना जिथे देवही दुर्बल ठरले तिथे आपल्यासारख्यांचं काय?

*पुरुषस्य भाग्यम्* हा सुद्धा असाच प्रश्न उभा करणरा विषय आहे.

रघुकुलोत्पन्न, सच्छील, मर्यादा पुरुष, एकपत्नीव्रती पितृ वचनी, बंधुप्रेमी, कर्तव्यपरायण रामाला चौदा वर्षे वनवास का घडावा?

राजा हरिश्चंद्रासारख्या सत्यप्रिय, वचनबद्ध, राज्यकर्त्याचे समस्त राज्य जाऊन त्याची दैना का व्हावी?

भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्यांसारख्या महारथींना दुर्योधनासारख्या अधर्मी व्यक्तीला कोणत्या लाचारीला बळी पडून साथ द्यावी लागली?

युधिष्ठिराने कौरवां सारख्या नीच वृत्तींबरोबर द्युताचा डाव मुळातच मांडलाच कशाला?

आणि कौंतेय? सूर्यपुत्र, प्रचंड बलशाली, कवच कुंडल घेऊन जन्माला आलेल्या या कर्णाला सुतपुत्र म्हणून का जगावे लागले? परशुरामाचा शाप, इंद्राची चालाखी आणि अपात्र व्यक्तीशी मैत्रीच्या वचनात अडकलेल्या कर्णाचे भाग्य कसे भरकटत गेले हा केवळ जर— तर चाच प्रश्न उरतो.

अर्जुनासारख्या धनुर्धराला बृहन्नडा बनून स्रीवेषात वावरावे लागले.

भीमाला गदेऐवजी हातात झारा घ्यावा लागला..बल्लवाचार्याची भूमिका करावी लागली.

कृष्णा सारख्या युगंधराचाही शेवट मनाला थक्क करतोच ना?

आणि वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी होतो हे सत्य केवळ कल्पनेच्या पलीकडचं नाही का?

अर्थात हे सर्व पुराणातलं आहे. पिढ्यानुपिढ्या ते आतापर्यंत आपल्याकडे जसंच्या तसं वाहत आलेलं आहे. पण या सर्व घटनांचा संदर्भ मानवाच्या सध्याच्या जीवनाशी आजही आहे. कुठे ना कुठे त्यांचे पडसाद आताच्या काळातही उमटलेले जाणवतात.

फूलन देवी पासून ते नरेंद्र मोदी पर्यंत ते उलगडता येतील.

जन्मतःच कुठलाही माणूस चांगला किंवा वाईट नसतोच. तो घडत जातो. एखाद्या व्यक्तीचे पूर्ण रूप जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा त्यामागे अनेक घटकांचा प्रभाव असतो. संस्कार, नितीअनितीच्या ठोस आणि नंतर विस्कटत गेलेल्या कल्पना, भोवतालची परिस्थिती, त्यातून निर्माण झालेली अगतिकता, अपरिहार्यता किंवा ढळलेला जीवनपथ अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे कुणाच्या चारित्र्याबद्दल अथवा भाग्या बद्दल जजमेंटल होणं हे नक्की चुकीचं ठरू शकत.

*आधी होता पाग्या त्याचा झाला वाघ्या*

असे सहजोद्गार निघतातच की…

रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा एखादा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो किंवा केवळ गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेली एखादी स्त्री नव्याने शुचिर्भूत होऊन पिडीतांसाठी देवासमान ठरू शकते.

कुणाचं भाग्य कसं घडतं याविषयी मला एक सहज वाचलेली कथा आठवली ती थोडक्यात सांगते.

दोन भाऊ असतात. त्यांचे वडील दारुडे व्यसनी असतात. दोन्ही भावांवर झालेले कौटुंबिक संस्कार हे तसे हीनच असतात. कालांतराने वडील मरतात. दोघे भाऊ आपापले जीवन वेगवेगळ्या मार्गावर जगू लागतात. एक भाऊ अट्टल गुन्हेगार आणि बापा सारखा व्यसनी बनतो. मात्र दुसरा भाऊ स्वतःच्या सुशील वागण्याने समाजात प्रतिष्ठा मिळवतो. हे कसे? त्यावर उत्तर देताना व्यसनी भाऊ म्हणतो, “आयुष्यभर वडिलांना नशेतच पाहिलं त्याचाच हा परिणाम.”

पण दुसरा भाऊ म्हणतो, “वडिलांना आयुष्यभर नशेतच पाहिलं आणि तेव्हांच ठरवलं हे असं जीवन आपण जगायचं नाही. याच्या विरुद्ध मार्गावर जायचा प्रयत्न करायचा आणि ते जमलं”

म्हणूनच भाग्य ठरवताना कुळ, गोत्र खानदान, संपत्ती, शिक्षण अगदी सुसंस्कार हे सारे घटक बेगडी आहेत. विचारधारा महत्त्वाची आणि त्यावरच चारित्र्य आणि भाग्य ठरलेले आहे. मात्र कुणी कसा विचार करावा हे ना कुणाच्या हातात ना कोणाच्या आवाक्यात. बुद्धिपलीकडच्याच या गोष्टी आहेत

या श्लोकाचा उहापोह करताना मी शेवटी इतकेच म्हणेन की,

*दैव जाणिले कुणी

लवांकुशाचा हलवी पाळणा

वनी वाल्मिकी मुनी…।।

 

तेव्हा जजमेंटल कधीच होऊ नका. काही निष्कर्ष काढण्याआधी वेट अँड वॉच.

अहो जे देवालाही समजले नाही ते तुम्हा आम्हाला कसे कळेल?

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा