*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*
*युवापिढी सावधान.. कुठे चुकते?*
कालची युवा पिढी आणि आजची युवा पिढी यात मोठे अंतर पडलेले आपण पहातच आहोत.वयाच्या मानाने किशोर, युवक त्यावेळी सामाजिक, कौटुंबिक भान जपणारे होते.परिस्थितीचं योग्य आकलन त्यांना असायचं.जबाबदारीची जाणीव ,संस्कार मुल्ये जपणारी ती पिढी. परिश्रम, कष्ट, व्यायामाने, आहाराने, भक्कम, पीळदार शरीरयष्टी लाभत होती. सात्विक संस्काराने सुसंस्कृतही होती.
आज मात्र ही स्थिती अपवादानेच दिसते. विभक्त कुटुंबपध्दती, आवश्यकता म्हणून आईवडील दोघेही अर्थार्जनासाठी बाहेर. घरे लहान, खेळायला जागेचा अभाव, मुलांना शाळा, ट्युशन, क्लासेसचे व दप्तरांचे ओझे, प्रचंड मानसिक ताण किशोरावस्थेतच सहन करावा लागत़ो. कधी कुटुंब छोटी, मिळकत मोठी असेही असल्याने भोगवादी संस्कृतीची भरभराट होऊ लागली. चंगळवादी वातावरण आले, मी, माझं, माझ्यासाठी हा भाव युवकांच्या मनात वाढू लागला. बाहेरच्या स्वच्छंदी जगातील अनेक साधनं हाती अनायसे मिळू लागली आणि संयमाची जागा स्वैरतेने बहुतांशपणे घेतली. वाचन, पुस्तके माहिती मिळवणे, ज्ञानवर्धन अगदी कमी झाले. स्मार्टफोन अधिक स्मार्ट होऊन हवं त्यासोबतच नको तेही देऊ लागला. मुलं त्या विळख्यात पार गुरफटून गेली. वेगवेगळी व्यसनं तरुणांच्या तनामनात प्रवेश करती झाली.
हे सगळं कसं सावरावं हा प्रश्न पालक, शिक्षक समाज सगळ्यांनाच पडला आहे.
खूप बदल झाले पण खूप करायचेही आहेत.
मुलांच्या युवकांच्या मनात सकारात्मक भावना देशाप्रती, समाजाप्रती जागवायला हवी, संस्कारांची महती त्यांना पटवायला हवी.
प्रत्येकाने ही सुरवात आपआपल्या घरापासून केली तर आजचा युवक नक्कीच सुधारेल. त्याला विश्वास, आधार हवा तसेच प्रेम जिव्हाळा ही हवा आहे. सगळ्यांनी प्रयत्न केल्यास आजचा युवक निश्चितपणे सावरत सावधान होईल!
***********************
अरुणा दुद्दलवार@✍️