वैभववाडीत १८ मार्च पासून ‘जाणता राजा’ महानाट्याचे होणार प्रयोग;
*प्रेक्षकांना मोफत पाहता येणार हे महानाट्य
*१५० कलाकार सहभागी होणार,घोडे , उंट यांचा असणार सहभाग
*नाटक स्थळी पोहचण्यासाठी एसटी बस ची प्रशासनाकडून करण्यात आली सुविधा
*भव्य रंगमंच उभारून नाटकाची पूर्ण झाली जय्यत तयारी
वैभववाडी प्रतिनिधी
३५० व्या शिवराज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित १८ मार्च ते २० मार्च या कालावधीत जाणता राजा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याची तयारी पूर्ण झाली आहे. या महानाट्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून पूर्णतः मोफत आहे.
वैभववाडी तालुक्यात पहिल्यांदाच जाणता राजा महानाट्य सादर होत आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांना विनामूल्य (मोफत) हे महानाटक पाहता येणार आहे. नाधवडे महादेव मंदिर नजीकच्या भव्य पटांगणावर सायंकाळी ६.३० वा. ते रात्री १० या वेळेत हे महानाट्य संपन्न होणार आहे. जाणता राजा या नाटकामध्ये जवळपास १५० कलाकार सहभागी होणार आहेत. घोडे देखील या नाटकात पहावयास मिळणार आहेत. प्रशासनाकडून नाटक स्थळी वेळेत पोहचण्यासाठी एस. टी. सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कणकवली, देवगड तसेच अन्य तालुक्यातून एसटी सेवा देण्यात येणार आहे. वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांतून देखील एसटी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जाणता राजा या महानाट्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सात ते आठ हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. बचत गटांसाठी स्टाॅल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छतागृह, शौचालय यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी जगदीश कातकर, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक अवसरमल, नायब तहसीलदार अनंत कवळेकर यांनी नाधवडे येथे जाऊन मैदानाची पाहणी केली. जाणता राजा या महानाट्याचे आयोजन करुन सदर नाटक पाहण्याची तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सुवर्णसंधी उपलब्ध करून शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.