जानवली बौद्ध वाडी येथील घटना : दुचाकी पत्र्यावर आदळून अपघात…
कणकवली
मुंबई-गोवा महामार्गावरील जाणवली बौद्धवाडी येथील अपघातात कलमठ येथील बाबाजी ऊर्फ बाळा नांदगावकर ( वय २७) हा युवक ठार झाला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. अपघातातील जखमी युवकाला पडवे येथील रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. महामार्गावर लावलेल्या डायवर्षणच्या पत्र्याला धडकून हा युवक ओहोळात फेकला गेला होता.
बाळा नांदगावकर हा युवक काल रात्री हुंबरट येथून कलमठच्या दिशेने येत होता. महामार्गावरील जानवली बौद्धवाडी येथील ओढ्यावर डायवर्षण करण्यात आले आहे. मात्र त्याचा अंदाज न आल्याने नांदगावकर हा युवक दुचाकी सह डायवर्षण त्यांच्या पत्र्याला धडकला आणि थेट ओहोळात कोसळला. यावेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी बाबाजी नांदगावकर याला रिक्षांमधून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर दुखापत असल्याने त्याला पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. मागील कित्येक दिवस जानवली बौद्धवाडी येथे महामार्गावरील वाहतूक एकाच मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होऊन सुद्धा महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीला जाग येत नसल्याने प्रशासन अजून किती बळींची वाट पाहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बाबाजी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळतात मंगळवारी रात्री भाजपाचे युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, गुरुनाथ वर्देकर, सुरेश वर्देकर यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.