जिल्ह्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू
– जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तावडे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 चा कार्यक्रम जाहिर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 07 मे रोजी मतदान तर 4 जून रोजी मतमोजणी
सिंधुदुर्गनगरी
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. 46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रविंद्र मठपती, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. तावडे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार असून या कार्यक्रमानुसार 46- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 12 एप्रिल, 2024 रोजी प्रसिध्द होईल. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 19 एप्रिल, 2024 असा आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी करण्याचा दिनांक 20 एप्रिल, 2024 असा असुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 22 एप्रिल, 2024 आहे. तर या निवडणूकीसाठी 07 मे, 2024 रोजी मतदान होईल तर 4 जून, 2024 रोजी मतमोजणी होईल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी असे 6 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 लाख 57 हजार 780 एवढे मतदार आहेत. यामध्ये पुरूष मतदार 3 लाख 28 हजार 307 तर स्त्री मतदार 3 लाख 29 हजार 473 एवढे मतदार आहेत. कणकवली मतदार संघात 2 लाख 25 हजार 588, कुडाळ मतदार संघात 2 लाख 10 हजार 378 तर सावंतवाडी मतदार संघात 2 लाख 21 हजार 814 मतदारांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 हजार 759 इतक्या 18 ते 19 वयोगटातील नवीन मतदारांची नोंद झाली आहेत. तर 85 वर्षावरील वयोगटातील मतदारांची संख्या 13 हजार 151 इतकी आहे. जिल्ह्यात 07 हजार 565 इतके मतदार हे दिव्यांग असून आवश्यकतेनुसार त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रावर त्यांच्या सोईसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात 918 मतदान केंद्र राहणार आहेत. त्याचबरोबरच बैठे व फिरते पथक कार्यान्वित करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितचे अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर, पोस्टर काढण्यात येवून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यावर्षी मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठया प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. मागील निवडणुकीत ज्या ठिकाणी कमी मतदान झाले होते, अशा ठिकाणी मेळावे, कार्यक्रम, पथनाट्य, शाळा व कॉलेज मध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.