कणकवलीत स्विमिंग पूल साठी चार कोटींचा निधी मंजूर
कणकवली
कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील २७ व २७ क्रमांकाच्या आरक्षणावरील क्रीडा सुविधा केंद्रासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत चार कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमधून क्रीडा सुविधा केंद्र परिसरात स्विमिंग पूल बांधण्यात येणार आहे. या निधीसाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विशेष प्रयत्न केले होते. तत्कालीन नगराध्यक्ष समीर नलावडे, तत्कालीन उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या प्रयत्नांतून क्रीडा सुविधा केंद्रासाठी त्यावेळी साडेचार कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यामध्ये क्रीडा संकुलाची इमारत,बॅडमिंटन कोर्ट, कबड्डी मैदान अशा अशा बाबी पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर स्विमिंग पूल कामासाठी निधी मिळावा, यासाठी नलावडे यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यानुसार आता चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. स्विमिंग पूल झाल्याने कणकवलीतील मुले, विद्यार्थी, हौशी जलतरणपटूंना याचा लाभ होईल. अनेक जलतरण स्पर्धांसाठी सराव करणे खेळाडूंना सोपे जाईल.या जलतरण तलावाचे काम लवकरात लवकर व दर्जेदार होईल, असा विश्वास नलावडे यांनी व्यक्त केला आहे.