कुडचे मळासह अन्य परिसरातील नागरिकांचा महापालिकेला इशारा
इचलकरंजी : प्रतिनिधी
शहरातील कुडचे मळा ,काडापुरे तळ ,बरगे मळा ,जुना चंदूर रोड ,
संत मळा यासह अन्य परिसरात कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.त्यातच अनेक कुपनलिका नादुरुस्त असल्याने पाणी टंचाईची भीषण समस्या भेडसावत आहे.तरी सदर समस्या तातडीने मार्गी लावावी ,अशा मागणीचे निवेदन भाजपचे शहराध्यक्ष पै.अमृत भोसले ,माजी नगरसेवक रविंद्र लोहार ,मोहन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त तैमुर मुल्लाणी यांना सादर केले.दरम्यान , याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी,अन्यथा येत्या १५ दिवसात महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की ,गेल्या अनेक वर्षांपासून कुडचे मळा सिमेंट गल्लीत अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे २० घरांना पाणी पुरवठाच होत नाही.अशीच परिस्थिती जुना चंदूर रोड ,बरगे मळा ,आवाडे अपार्टमेंट,
संत मळा ,दातार मळा ,लंगोटे मळा ,तांबे माळ ,हेरलगे मळा यासह अन्य परिसरात उद्भवत आहे.त्यातच बहुतांश ठिकाणच्या कुपनलिका
विद्युत मोटारी बंद पडून त्या
नादुरुस्त अवस्थेत आहेत.त्यामुळे पाण्याची पर्यायी व्यवस्था देखील कोलमडली आहे.याचाच परिणाम सदर परिसरात पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे.याबाबत वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा वाईट अनुभव नागरिकांना येत आहे.याचाच परिणाम सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असूनही नागरिकांना कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली असून नागरिकांना विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठा ञास सहन करावा लागत आहे.त्यातच काही ठिकाणी नियमित गटारींची स्वच्छता ,कचरा उठाव होत नसल्याने देखील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा येत्या १५ दिवसात महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी दिला आहे.
यावेळी उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करुन नागरिकांची पाणी व अन्य मुलभूत नागरी सुविधांअभावी होणारी गैरसोय दूर करु ,असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष पै.अमृत भोसले ,माजी नगरसेवक रविंद्र लोहार ,आशा कामत ,शोभा चौगुले ,गीता सुतार ,लता सुतार ,रंजना कामत, ज्योती बाणदार ,रजिया मकानदार ,अक्काताई सुतार ,मुमताज चिंचणे ,छाया डंबाळ ,राजव्वा माळी ,तानाजी सुतार ,ताजुद्दीन चिंचणे , समीर नदाफ ,रोहन कुंभार , अभिषेक आंबले ,उत्तम कुंभार यांच्यासह महिला – पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.