You are currently viewing वसंत येता दारी…

वसंत येता दारी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वसंत येता दारी….*

 

वसंत येता दारी बाई करेल कोकिळ कुहू कुहू

फुटे पालवी झाडांना ती किती मखमली मऊ मऊ..

पिवळे सुंदर ऊन कोवळे झाडे डोलती डौलात

घरात डोकावती शलाका फटीतल्या त्या कौलात..

भृंग खेळती फुलांवरी हो फुलपांखरे भिरभिरती

कौलारातून किती कवडसे धुलीकणांसवे बागडती…

स्वच्छ नि सुंदर हवा किती ती गार गार नि सुखावह

पळस पांगारा गुलमोहर फुलती घालती जगा मोह…

अंगार खेळतो पळस जणू तो गुलमोहराचा डौल पहा

नजर बांधतो जणू फुलांनी रंगांची उधळण अहा..

नटवेली ती वसुंधरा हो सुगंधात जणू स्नात बसे

उष्ण वात जरी थोडेथोडे गाल गुलाबी प्राची हसे..

रथ सूर्याचा दमादमाने गारूड सृष्टीवर करतो

पिवळी जाती हासत नाचत कोंभ तिथे नाजुक

उठतो…

मोहरलेले आम्रतरू ते बाळे घेऊन जोजवती

इवली इवली बाळ फळे ती वाऱ्यावर डोलती

किती..

प्रसन्नतेचा सळसळणाऱ्या पिवळ्या धूसर लोंब्यांचा

ज्वारी दाणे किती कोवळे ताजा ताजा हुरड्याचा…

सणवाराचा फुलाफुलांचा चैत्र घेऊन येतो गुढी

नववर्षाचे करती स्वागत शुभकार्याला नसे अढी…

पक्षी बोलती वारे वाहती प्रसन्नता घेऊन येतो

चैतन्याला सौहार्दाला वसंत पेरूनच जातो…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा