कसई-दोडामार्गसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर…
शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार: नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची माहिती..
दोडामार्ग
गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासीयांची डोकेदुखी ठरणारा कसई – दोडामार्गचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमचा मिटणार आहे.कारण शहरासाठी साठवण टाकीसह असलेला तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचा जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर झाला आहे.अशी माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी गुरुवारी दिली. शहरासाठी मंजूर झालेल्या कामांची माहिती देण्यासंदर्भात येथील नगरपंचायत कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी वार्तालाप केला
.ते म्हणाले शहराचा नगराध्यक्ष म्हणून कार्यभार स्विकारल्यावर मला दोन वर्षे पूर्ण झाली .या दोन वर्षात तब्बल २२ कोटींची विकासकामे शहरात मंजूर करून आणली.पण हे श्रेय माझ्या एकट्याचे नाही.तर माझे सर्व सहकारी नगरसेवक , आजी – माजी सरपंच , पदाधिकारी , जुनी-जाणती मंडळी आदींच्या सहकार्यामुळे च हे साध्य करणे मला शक्य झाले. आणि आता तर शहरवासीयांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमचा मिटणार आहे. शहरासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्याने आणि आपली पाण्याची विहीर ही तिलारी नदीच्या काठावर असल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे गाळ विहिरीत साचून गढूळ पाणी येत होते.परिणामी या प्रत्येक वर्षी निर्माण होणाऱ्या प्रश्नावर कायमचा तोडगा काढायचा असेल तर जलशुद्धीकरण प्रकल्प नितांत गरजेचा होता.त्यामुळे शहरासाठी हा प्रकल्प मंजूर व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो.शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडेही मागणी केली होती.आणि त्यांनी ती पूर्ण केली असून शहरासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर केला आहे.तसे पत्र प्रशासनास प्राप्त झाले असून साठवण टाकीसाठी ६० लाख व मुख्य नळयोजनेअंतर्गत १ कोटी ७० लाख असे तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.त्यामुळे आता लवकरच हे काम सुरू होणार असून येणाऱ्या काळात शहरवासीयांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल असे श्री.चव्हाण म्हणाले. चौकट- नगराध्यक्षांनी मानले शिक्षणमंत्र्यांचे आभार – यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.या दोघांनीही शहराला नेहमीच झुकते माप दिले असून भरघोस निधी दिला आहे.त्यामुळेच शहराची विकास प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत झाली असे श्री.चव्हाण म्हणाले.