*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका सौ.अंजोर चाफेकर लिखित अप्रतिम लेख*
*आईपण पेलताना*
तसे पाहिले तर आमच्या पिढीनेही नोकरी, करिअर सांभाळत मुलांना वाढविले.
परंतु मी जेव्हा माझ्या मध्यमवर्गीय परीघातील पुढची पिढी बघते तेव्हा जीवाची घालमेल होते.
आज स्रीला किती आव्हानांना सामोरे जावे लागते आहे.
केवळ संसाराला हातभार म्हणून अर्थाजन नाही.
तिची करीअर, तिने निवडलेल्या क्षेत्रात तिला ठोस प्रगती करायची आहे.स्वतःला सिद्ध करायचे आहे.त्यामुळे तिचे कामाचे तास वाढले आहेत.९ते५ इतकी मर्यादित कामाची चौकट राहिली नाही.
हे सर्व करताना तिचे आईपण ही पेलायचे आहे.
सकाळी मुलाला शाळेच्या बस मधे सोडून आले की
भरभर आटपून ऑफीसची तयारी.
जेवणाचे डबे ,मुलाच्या नाश्त्याचा डबा, संध्याकाळच्या
जेवणाची तयारी,सेमिनारची तयारी, मुलांचा अभ्यास,वयस्क आईबाबांची
काळजी, त्यांच्या डाॅक्टरच्या अपाॅयन्टमेंट्स आणि बरंच काही.
कधी कधी मनात अपराधीपणाची भावना येते.
‘मी मुलाला त्याच्या वाढत्या वयात पुरेसा वेळ देऊ शकत नाही.’असे शल्य मनाला बोचत होते.
मुलाचा अभ्यास इतका वाढलाय.
शिवाय त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पियानोचा क्लास,
क्रिकेट किंवा फुटबॉलचे कोचिंग,स्वीमिंगचा क्लास,
वेदिक मॅथ्स आणि बरंच काही…
ऑफीसच्या डेड लाईन्स,कधी कामासाठी बाहेरगावी किंवा परदेशात टूरिंग तर कधी वर्क फ्राॅम होम.
कधी मनाला मरगळ येते, खूप गळून गेल्यासारखे वाटते पण उसंत घ्यायला वेळच नसतो.
ब-राच वेळा जोडीदाराचेही टूरिंग चालू असते.त्यामुळे
सिंगल पेअरेंटिंग हाताळावे लागते.
माझ्या ओळखीतली बरीच कपल्स मला म्हणतात,
काकी, मूल झाल्यावर आमचे आयूष्यच बदलून गेले.
मूल नव्हते तेव्हा आम्ही खूप कुल होतो.
म्हणजे आईपणाचा आनंदही नीट भोगता येत नाही.
हल्ली मुली उशीरा मूल होऊन देतात.
माझ्या ओळखीतल्या एका मुलीला वयाच्या ४०व्या वर्षी जुळ्या मुली झाल्या.
तिने त्यांना सांभाळण्यासाठी जाॅब सोडला.
तिची आईही आता वयस्क, कशी सांभाळणार या वयात जुळ्या मुलींना?
इतक्या उशीरा मूल झाल्याचा आनंद तर झाला परंतु
करिअर सुटल्यामुळे डिप्रेशन आले.आईपण लाभणे ही जशी प्रत्येक स्रीची मानसिक व शारीरिक गरज असते
तसेच हल्ली स्वतःची ओळख असणे ही स्रीची मानसिक गरज असते.आता तिच्या जुळ्या मुली 1वर्षाच्या झाल्यावर तिने जाॅब घेतला.होते थोडी तारांबळ, पण करते मॅनेज.
दोघेही तरूण नवरा बायको हे नोकरीतल्या कामाचा ताण,स्पर्धा ,उच्च राहणीमान व कर्जाचे हप्ते यामुळे
चिडचिडे झालेले असतात.एकमेकांना वेळ देऊ न शकल्यामुळे एकमेकांना समजून घ्यायला कमी पडतात.
अगदी प्रेमविवाह असला तरी कधी कधी दोघांचे पेटेनासे होते. अशावेळी आपल्या दोघांतील तणाव मुलाला समजू नये यासाठी स्रीची धडपड चालू असते.एकाच वेळी तिला किती अवधाने सांभाळावी लागतात.
स्री जेव्हा माता बनते तेव्हा तिच्यामुळे तिच्याही नकळत एक शक्तीचा स्रोत निर्माण होतो.
जननी हे शक्तीचे पहिले विकसीत रुप आहे.
आपल्या देशात स्रीचे पूजन हे तिच्यातील मातेचे पूजन असते.कारण मातेमधे एक ईश्वरी अंश आहे असे मानले जाते.
आपण माता यशोदा,जीजामाता अशा अनेक मातांना मानतो कारण त्यांनी आपल्या अपत्यांना घडविले.
त्या असामान्य माता असतील.
पण आमच्या आजच्या पिढीच्या सामान्य माता सुद्धा
असामान्य आहेत. किती समर्थपणे त्या आपले आईपण पेलत आहेत.वेळेची कसरत करून,अव्याहत काम करून त्या स्वतःलाही घडवतात व आपल्या मुलांचेही भविष्य घडवत आहेत.शिवाय जिद्दीने परिस्थितीला टक्कर देत आहेत.
मला खरंच खूप कौतुक वाटते आजच्या पिढीतल्या या तरूण मातांचे.
या अशा दोन्ही आघाड्या सांभाळणा-रा स्त्रियांकडे
बघण्याचा आपला द्रृष्टिकोन आपण कौतुकाचा असला पाहिजे.तिला पुरणपोळ्या किंवा मोदक बनवता नसतील येत.आलेल्या पाहुण्यांची सरबराई करायला वेळ नसेल.
तरीही ती तिच्या परीने स्वीगी, अमॅझाॅन च्या मदतीने
वाढदिवस वगैरे साजरे करते.
तिने कितीही स्वतःला सुपर वुमन बनविण्याचा प्रयत्न केला तरी तिला लिमिटेशन्स येणारच.तेव्हा आपणच
आई वडील या नात्याने, शेजारी य नात्याने,समाज म्हणून
तिला मदतीचा हात पुढे केला पाहिजे.
सौ.अंजोर चाफेकर,मुंबई.