You are currently viewing १२ मार्चला यशवंत – विठाई गौरव सोहळा

१२ मार्चला यशवंत – विठाई गौरव सोहळा

 

पिंपरी (दिनांक : ०९ मार्च २०२४) :

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने मंगळवार, दिनांक १२ मार्च २०२४ रोजी यशवंत – विठाई गौरव सोहळा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे दुपारी ०४:०० वाजता संपन्न होणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून आदर्शगाव संकल्प योजना कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार अध्यक्षस्थान भूषवतील. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक ह. भ. प. किसनमहाराज चौधरी तसेच कृषिभूषण सुदाम भोरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या सोहळ्यात रावेत येथील कृषिनिष्ठ शेतकरी शांताराम खंडू भोंडवे आणि त्यांच्या मातोश्री सरस्वती खंडू भोंडवे यांना यशवंत – विठाई सन्मान प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर श्री गणेश रोडलाईन्सचे संचालक तेजस डेरे (यशवंतराव चव्हाण उद्योगभूषण पुरस्कार), धामणे (मावळ) येथील माजी सरपंच दीपाली गराडे (वेणूताई चव्हाण युवती पुरस्कार), कोयाळी, तालुका खेड येथील स्नेहबन संस्थेचे अशोक देशमाने आणि अर्चना देशमाने या दांपत्याला (यशवंत – वेणू युवा – युवती सन्मान) प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी आणि एम पी एस सी न्यूजच्या मुख्य संपादकपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान श्रमश्री पुरस्कारविजेते कामगार बाजीराव सातपुते यांचे ‘यशवंतराव इतिहासाचं एक पान…’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विनाशुल्क असलेल्या या सोहळ्याचा सर्व नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभाग अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.

– प्रदीप गांधलीकर

९४२१३०८२०१

७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा