*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*महिला दिनानिमित्ये एक गझल*
*स्त्री*
आतपाची प्रकृती ही वादळे झेलून राहे
आदिशक्ती स्त्रीच जाणा संकटे साहून राहे
हास्य वदनावर तिच्या उमटे कसे ते सर्वकाळी
थांगपत्ता लावणे नाही कसा जाणून राहे
लेक लाडाची अशी संसारदक्षी काय झाली
वत्सला माता बने कष्टांस ती सोसून राहे
चाक आहे स्त्री रथाचे तिजविना संसार नाही
सावली आहे वडाची सत्य हे समजून राहे
द्रौपदी तारा अहिल्या पंचकन्या ज्ञात सार्या
जानकी मंदोदरी सर्वांस ती उमजून राहे
बौद्धिकाची पातळी स्त्रीची नसे ठावे कुणाला
कोणतेही क्षेत्र घ्या प्राविण्य ती कमवून राहे
आज नाही भेदभावा अल्पसा थारा मुळी हा
लावुनी खांद्यास खांदा कार्यास स्त्री वाहून राहे
*अरूणा मुल्हेरकर*
*मिशिगन*
*माझ्या सर्व माता भगिनींस जागतिक* *महिला दिनाच्या शुभेच्छा!*