You are currently viewing महिलादिन

महिलादिन

*”मेघनुश्री” या टोपण नावाने प्रसिद्ध लेखिका ग्रामीण पत्रकार मेघा कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*महिलादिन*

 

तसे पहायला गेले तर इतर महिन्यांसारखाच कॅलेंडरमधला ‘मार्च’ हाही एक महिनाच त्यांत नाविन्य वाटण्यासारखे काय ? पण हा महिना सुरू झाला की महिलावर्गात चैतन्य दिसू लागते. याचे कारण म्हणजेच या महिन्याच्या आठ तारखेला गेल्या बरेच वर्षांपासून महिला दिन साजरा केला जात आहे. जिकडे तिकडे या दिवशी तिचीच चर्चा. पण जर विचार केला तर वर्षातल्या एका दिवसाचे हे स्वातंत्र्य. लेखनाच्या सवयीमुळे या मार्गाने अशा विषयावर मतमांडणी होऊ शकते असे वाटत राहिले. एकदिवसीय शुभेच्छा देताना, घेताना आजची स्त्री आनंदित होते का? हा प्रश्न मनांला भेडसावत रहातोच. स्त्रीचे वागण्या, बोलण्याचे स्वातंत्र्य खरेच या [जागतिक महिला दिन] आठ मार्च या एका दिवसाचेच आहे का? याचा विचार निश्चितच झाला पाहिजे.

हे मनांतले प्रश्न कागदावर उमटवताना विचारधारा वाहू लागते. मागच्या पिढीतील स्त्रिया आणि आजची स्त्री यांच्यातील फरक जाणवू लागतो. देशांतील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई टिळक यांच्या पतींनी त्याकाळी शिक्षणाला दिलेले महत्व आणि पत्नीला समांजात मान मिळवून देण्याची तगमग,तळमळ आठवते. मालिका, चित्रपटांमधून या महाराष्ट्रीयन स्त्री व्यक्तिमत्वांची ओळख नव्या पिढीला करून दिली जात आहे. ज्यांनी खूप पूर्वी काळाच्या पुढे जाऊन विचार केला. महिला दिन साजरा होतो आणि व्हावा त्याबद्दल दुमत नाही. त्याचबरोबर तिच्या मतांचाही आदर करणे गरजेचे आहे. त्यासाठी विशेष अशा एका दिवसाची गरज भासू नये असे स्पष्टपणे इथे सांगावेसे वाटते.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगांत एकाच कुटुंबातील प्रत्येकाचे विश्व वेगळे झालेले आहे, त्यांत संपुष्टात येत चाललेला संवाद हे एक मुख्य कारण आहे. आई आणि मुलगी किती वेळ एकमेकांशी बोलतात ? तिच्या जन्मा पासून तू मुलगी आहेस तुला हे करता येणार नाही, जमणार नाही अशीच वाक्ये प्रवासांतही ग्रामीण,नागरी दोन्ही भागांत कानावर पडतात. ही खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, या सगळ्यांत त्या उमलणाऱ्या कळ्यांच्या आत्मविश्वासाचे काय ? परिवर्तन होणाऱ्या भावविश्वांत प्रवेश करताना त्यांना कितपत समजून घेतले जाते ? याचे एक भय मनांत वाटत रहाते. काही ठिकाणी अजूनही असे चित्र आहे, कुटुंबात मुलगी मोठी झाली कि फक्त तिच्या विवाहाची, संसाराची चर्चा सुरू होते. आसपास घडणाऱ्या समाजातील घटना आणि कुटुंबाचे एक प्रकारचे दडपण या सगळ्यांत ती मुलगी मात्र गांगरून जाते. वाढत्या वयांत आईकडे मैत्रीण म्हणून पहांत असते. पण सल्ला मिळायच्या ऐवजी बऱ्याच वेळां ओरडाच मिळतो.

स्त्री वर्गास विश्वास देऊन समजून घेतले तर तीही तिचे भविष्य चांगले घडवू शकते. या विचारसरणीत एक सकारात्मकता जाणवते. आज सर्वच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत अगदी लग्नानंतर सुद्धा शिक्षणाचे महत्व अपरंपार वाढलेले दिसून येते. निरीक्षणातून असेही ध्यानांत येते की, सगळ्याचजणी आजही नोकरी व्यवसाय करतात असे नाही, तरीही घराबाहेर पडून आजची स्त्री कुटुंबासाठी खूप काही करत असते, पूर्वीच्या मानाने. बदललेला काळ, जीवनशैली, अविश्वसनीय परिस्थिती त्यातून निर्माण होणारी आव्हाने आणि समस्या, मुलांचे इंग्रजी माध्यमातले शिक्षण, इथे तर पदोपदी तिच्या ज्ञानाचा उपयोग होतो. ग्रामीण भागांतील स्त्री देखील छोटे छोटे घरगुती व्यवसाय करत असते. अनेक रोजगारही त्या सर्वांसाठी आज उपलब्ध आहेत, असे हे चित्र पाहिले की, स्त्री चे क्षितिज विस्तारणाऱ्या त्या जाणकार व्यक्तीमत्वांसमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. वैचारिक उच्चतेसमोर नकळत हात जोडले जातात.

आजच्या युगांतही शिक्षणाला महत्व देणाऱ्या गेल्या पिढीतील कर्तुत्वाला महाराष्ट्र विसरलेला नाही. उलट त्या सर्वांच्या विचारांचा सन्मान केला जातो. ही रत्ने अविस्मरणीय आहेत, ग्रामीण भागांतील मुली शिक्षण घेण्यासाठी, कोणत्याही ऋतुची तमा न बाळगता बसने,सायकलने किंवा काही अंतर चालत शाळेत जातात. अर्थातच ही सर्व दृश्ये मनांस सुखावून जातात. तत्कालीन स्त्री साठी हे विचार किती पुढचे आणि त्यांत पतीच्या मनासारखे वागायला गेले तर इतर मंडळींचा रोष ओढवून घ्यावा लागत असे. अशी सगळी आव्हाने पेलून या स्त्रियांनी स्वत:ला सिद्ध तर केलेच पण पुढील अनेक पिढ्यांसाठी स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला. या त्यांच्या ऋणातून स्त्री समाज कधीच मुक्त होऊ शकत नाही.

आज केवळ मुलगी-आई यांच्यातलाच नाही तर इतर नात्यांमधील स्त्रीवर्गाची एकमेकींशी चाललेली स्पर्धा जे तिला करायला मिळाले ते मला का नाही? अशी विचारधारणा जगण्यांतील धावपळ, अस्तित्व, कर्तव्य आणि जबाबदारी सर्वच आघाड्यांवरची कसरत यांतून संवाद जवळजवळ होत नाही. आभासी दुनिया त्यांतील मैत्री या सगळ्यामुळे समाजातील हिंसात्मक प्रकार वाढीस लागलेत. एखादी स्त्री जरी घरच्यांची संमती घेऊन काही करत असेल तरीही सामाजिक स्तरावर तिच्या विचारांना प्राधान्य दिले जात नाही. रूढी, परंपरा यांतून एखादीने वेगळी वाट निवडली तर तिच्या कार्याचे कौतुक फारसे होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. आजही कार्यालयीन कामकाज संपवताना थोडा उशीर झाला तर मनांतील दडपणाचे पडसाद मात्र त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर उमटू लागतात.

खरंच पहायला गेलं तर पूर्वीच्या काळी घरचा महिला वर्ग आपापसांतील सुखदु:खे वाटून घेण्यांत यशस्वी ठरला. त्यांना बाहेरचे जग, त्यांतील व्यवहार याची संधी मिळाली नाही. पण आजची स्त्री वैचारिक स्वातंत्र्य असूनही सुखी आहे का? हा प्रश्न काही केल्या मनांतून निघून जात नाही. आज ती शैक्षणिक आणि आर्थिक बाजूंनी सक्षम आहे, पण समाजमानसातला तिच्याबद्दलचा दृष्टिकोन यत्किंचितही बदललेला नाही. “LIFE – PARTNER” या नवीन संकल्पनेमुळे तिचे गृहव्यवस्थेतील स्थान अबाधित होते आहे. पण याचेही प्रमाण फार थोडेच आहे. कष्टकरी महिला वर्गासाठी मनांत कणव दाटून येते. जिच्या संसारात कष्टांशिवाय पर्याय नसतो. आजारी असतानाही कामावर जावे लागते. पण तिथे आपुलकी, आत्मियता मिळेलच याची शाश्वती नसते. कष्टांचे, यातनांचे स्वरूप पिढ्यांपिढ्या प्रमाणे बदलत गेले, तरीही सहनशक्तीचा वारसा मात्र स्त्रीकडेच आजतागायत राहिला याचेच नवल वाटते.

महिलादिनानिमित्त एक चांगली बाजूही इथे मांडाविशी वाटते “तव्यावरची भाकरी खरपूस भाजायची की करपून द्यायची याचा सुकाणू गृहलक्ष्मीच्या हाती असतो.” शिक्षणाने अस्तित्वाचे दोरखंड बळकट होतात. निर्णयक्षमता अफाट होते. सन्मानाची द्वारे खुली होतात. आज जरी महिला स्वतंत्र असली तरी विवाहानंतर दोन्ही कुटुंबाचा विचार करूनच तिला पाऊल पुढे टाकावे लागते. नागरी / शहरी भागांत अनोळखीपणा जास्त असतो. त्याच्या बरोबर विरुद्ध सौहार्दाचे/मैत्रीचे नांते ग्रामीण भागांत पहायला मिळते. कारण सगळे गांवच प्रत्येक घरांला ओळखत असते. सध्याच्या जगांत महिला सक्षमीकरणाचे प्रमाण अनुकूल आहे. मदत फारशी मागितली किंवा घेतली जात नाही. इथे अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो रूढी, परंपरा, बंधने झुगारून देऊन कार्य करत रहाण्याचा मानस आजही दाखवला तरी, महिलांच्या पदरी प्रथम विरोधच होतो. पण चांगले काम करत आहे हे सिद्ध होताच, त्याची पावती मिळताच सर्वचजण आपसूक सोबत येतात. तोपर्यंत निष्ठेने कार्य करत रहाता आले पाहिजे.

मुलगी शहरांत जाऊन शिकणार असेल तर प्रथम आईने, घरांतल्या महिलांनी तिला धैर्य दिले पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरी बाजू ही सुद्धा आहे कि घरच्यांशी संपर्कात रहाण्याचा प्रामाणिकपणा मुलींनीही मनापासून जपला पाहिजे. हेच सर्व करताना आई-मुलीच्यात, आजी-नातीच्यात उत्तम संवाद पाहिजे. आधीच्या पिढीतील स्त्रियाही प्रचंड हुषार होत्याच. त्यांचे ज्ञानही वाखाणण्याजोगे होतेच. एक स्वानुभव इथे सांगावासा वाटतो. जेव्हा मी एम.ए. मराठी झाले, निकालाच्या दिवशी घरी येऊन पायां पडत असताना माझ्या तिसरी शिकलेल्या आजीने कानमंत्र दिला. “मराठी भाषेत पदव्युत्तर झालीस म्हणजे त्या भाषेवर प्रभुत्व मिळविलेस असे नाही, तर आज तुला त्या भाषेचा आशिर्वाद मिळाला असे समज.” हे ऐकता क्षणी सर्टिफिकेट वरची [MASTER OF ARTS] हे शब्द सर्रकन डोळ्यासमोर येत राहिले. त्याच वेळी हेही लक्षांत आले की, “धैर्य आणि सामर्थ्याने जगलेला जीवनानुभव काय असू शकतो?” विशेषतः आज शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढते आहे. त्यासोबत स्वसंरक्षणाचा विचारही त्या आणि त्यांचा परिवार करत आहे. यांतून पुढे जाऊन दोन्ही कुटुंबांसाठी त्या निश्चितच मदत करू शकतात, चांगल्या प्रकारे उभा राहू शकतात.

सगळ्यांत महत्वाची बाब अशी की कोणत्याही नात्याचा दुस्वास करू नये उदा : मुलगी-सून, नणंद-भावजय, जाऊ-जाऊ, मुलीचे ढीगभर कोडकौतुक आणि सुनेचा तीळभर दोष दोन्हीही घातकच. जे घराचे घरपण टिकवून ठेवतात, आपलेपणा देतात ती नाती सन्मानाने टिकून रहातात. जोपर्यंत आपण कुणाला तरी मदत करत असतो, कुणाच्या तरी उपयोगी पडत असतो तोपर्यंतच तुम्हांला मित्रपरिवाराकडून सहकार्य मिळत असते. दारांतली रांगोळी आणि ताटातली पोळी ही तारेवरची कसरत महिलेची दैनंदिनी असते. हे घरच्या आणि इतर सदस्यांनी समजून घेतले तर अधिकच चांगला बदल घडू शकतो. एका महिलेसाठी नाती सांभाळत, स्वत:ची ओळख निर्माण करणे बोलण्याइतकं सोपं नाही हे सत्य आहे. सर्व विचार मांडताना पूर्वीची कुटुंबव्यवस्था किती अव्वल दर्जाची होती हे आपल्याही लक्षांत आल्याशिवाय रहात नाही. दोन स्त्रियांमध्ये वादच नव्हते असे नाही. पण ते माजघराच्या पायरीच्या आत असायचे, आपापसांत मिटवले जायचे. घरचा पुरूषवर्ग पूर्णपणे या सगळ्या – पासून लांब असायचा.

आज याच्या बरोबर विरुद्ध चित्र दिसते, घरांतल्यांना जितकी माहिती नाही तेवढी बाहेरच्यांना मिळते. चिर दिसली की समोरची व्यक्ती फट पाडणारच, म्हणूनच कुठं व्यक्त व्हायचं, कुठं थांबायचं याचं भान असलचं पाहिजे, समजलही पाहिजे. असे म्हटले जाते कि किंवा काही ठिकाणी असे चित्र दिसते की, ‘नथ’ हा महिला वर्गाचा आवडता दागिना जो घालूनही स्वातंत्र्य मिळवता येते आणि न घालताही काही बंधने अक्षरश: वेसणी सारखी जाचक होत रहातात. वस्त्रपरिधानता पारंपारिक आहे आणि विचारांत आधुनिकता असेल तर मागासले पणाला थाराच उरत नाही. हे सर्व लेखन करत असताना मला वडिलांच्या घरांतील पूर्वज स्त्रियांची आठवण झाली. ज्यांना सन्मानाची कर्तुत्व परंपरा लाभली होती, असे आता लक्षांत येते. सदोदित कार्यरत रहाणारी ही व्यक्तिमत्वे खूप काही शिकवण देऊन जातात.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळांत केवळ आपल्याच कुटुंबाचा विचार होतो, तेव्हां तर त्यांनी संपूर्ण गांव सांभाळले, माया दिली, अडल्यानडल्यास मदत केली. ज्याकाळी फक्त देवदर्शनासाठी स्त्रीवर्ग बाहेर पडत होता त्याहीवेळी त्यांनी घोडदौड करत सगळ्या पंचक्रोशीवर नियंत्रण ठेवले. वाईटाला समज तर चांगल्याचे कौतुक हे त्यांच्या जीवनाचे तत्व होते. मध्यरात्री गावांतील स्त्रिला अपत्यप्राप्तीवेळी कुठलाही आडपडदा न ठेवता मदत केली जायची. हे सत्कर्म महत्वाचे मानले जायचे म्हणूनच गावकरी नि:संकोचपणे दरवाजा ठोठवायचे. मनाच्या श्रीमंतीला नशिबाची साथ होती. शिक्षणाचे महत्व पुढील सर्व पिढ्यांत आले, दुसरी-तिसरी पर्यंत शिकणाऱ्या, वाचनाचा आनंद घेणाऱ्या या पूर्वज स्त्रिया व आजच्या पिढीतील संगणकाचे सर्वोत्तम ज्ञान असलेल्या सूना याची सांगड मात्र निश्चितच मधल्या पिढीने घातली. पूर्वापार परंपरा आणि आधुनिक जग समजून घेणे हे सोपे नाही.

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे महत्व कुटुंबात असताना, मराठी विषय – कलाशाखा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, मला पूर्णपणे स्वातंत्र्य घरी दिले गेले. एम.ए.मराठी नंतर एकोणीस वर्षांनी एम.ए. हिन्दी करू शकले. ग्रामीण पत्रकारिता करण्यासाठी प्रचंड पाठिंबा दिला गेला आणि त्याचबरोबर एक वेगळे विश्व उलगडत जाऊन व्यक्तिमत्व घडत गेले. “शिक्षण घेताना वय किती आहे याचा कधी विचार करू नये, अडचणींना ही अपूर्व संधी समजावी. आजतागायत शिक्षणाने कुणाचे नुकसान झालेले नाही” हेच पालकांचे शब्द नेहमी मनांत घर करून रहातात. या सगळ्या व्यक्तिमत्वांचा खूप अभिमान वाटतो.” शिक्षणाची, कर्तुत्वाची अशी समई जपताना विनाकारण टीकेला सामोरे जावे लागते. अंगणातील तुळस मनांत जपत, आकाशाकडे झेप घेऊन स्वत्व सिद्ध करायचे तर प्रामाणिक प्रयत्न, निश्चितच केले पाहिजेत त्याला पर्याय नाही. महाराष्ट्रांतील तत्कालीन कालखंडात शिक्षणाच्या स्वातंत्र्यासोबत स्त्रियांना वैचारिक स्वातंत्र्य अनभवू दिले. म्हणून इथून पुढच्या पिढीतील स्त्रीवर्गालाही शिक्षणाचे भाग्य लाभावे, त्यांचे विचारही लक्षांत घेतले जावेत, विचारांना प्राधान्य मिळावे या जागतिक महिलादिनी सर्वाना मनापासून भरभरून शुभेच्छा.

 

©मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]

भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२

प्रतिक्रिया व्यक्त करा