You are currently viewing बॅलन्सशीट

बॅलन्सशीट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*

*बॅलन्सशीट*
—————————
सकाळी साडेपाचचा अलार्म वाजला. चला उठायला हवं . पण उठवलेच जात नाही आहे . शरीरच नकार देतय. अंगात तापाची कणकण वाटतेय .आज रजा घ्यावी काय आॅफिसातून . नको , कामाचं आधीच प्रेशर आहे त्यात रजा म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल . कितीही उपसला तरी कामाचा ढिग काही कमी होत नव्हता . या कर्ज विभागात तर कामाची कमतरताच नसते .जुनी कर्ज प्रकरणे , त्सांची वसूली , त्याचा पाठपुरावा ,वेळोवेळी त्यांना पाठविलेल्या नोटिसा , दरवर्षी घेतले जाणारे बी सी लेटर्स ,  क्षेत्रीय व विभागीय कार्यालयाने वेळोवेळी मागविलेली माहिती , स्टेटमेंटस् , नवीन कर्ज प्रकरणे , त्यांची सगळी कागदपत्रे , बॅलन्सशीटचे विश्लेषण करणे , खाते एनपीए होऊ नये म्हणून प्रयत्न करणे , एनपीए झालेले खाते पुन्हा अॅक्टीव्ह करण्यासाठी झटणे , एक ना हजार अशी कामे .जीव नुसता मेटाकुटीला यायचा , काही वेळा मनात विचार यायचा घ्यावी स्वेच्छा निवृत्ती , पण दुसर्‍याच क्षणी मन म्हणायचं , ” आव्हानांना घाबरतेस काय ? स्विकार चॅलेंज आणि चल पुढे , प्रामाणिकपणे काम करायचे . मग कसल्या अडचणी ?

घड्याळ बाबाकडे लक्ष गेले . बापरे सहा वाजलेत. उठले .सकाळची सगळी आन्हीकं आटोपली . आईला उठवलं , शंभरवर्षीय आई सर्वस्वी आम्हां भावंडांवर अवलंबून होती . तिला दात ब्रश करायला लावले . वेणी घातली , स्नान उरकलं . चहा पाजला .
आईला सांभाळणारी बाई नऊ वाजेला यायची .मी फटाफट स्वयंपाक उरकला , डबा भरला व धावतपळत आॅफिस गाठलं .

आपल्या टेबलाशी आले . पी सी चालू केला .आणि डे बिगीनला सुरूवात केली . काही महत्वाचे ईमेल आहेत काय पाहिले . त्यांना उत्तरे लिहिली . ग्राहकांच्या काही तक्रारी आहेत काय पाहिलं . एक तक्रार होती , त्याचा समाधानकारकपणे निबटारा केला .

इतक्यात माझ्या पी सी वर माझ्या वरीष्ठांचा मेसेज आला . मॅडम भेटून जा . मी केबिनमध्ये गेले . निलीमा मॅडम तुलसी पाईप्स , गौरव इंडस्ट्रीज ,प्रथमेश रि रोलिंग , प्रसन्ना सिल्क मील यांच्या बॅलन्सशीटचं अॅनालिसिस करायच आहे . तुम्ही केली काय सुरूवात .अगदी आम्हांला अग्रक्रमाने हे काम करायचं आहे .आता हा जानेवारी महिना , मार्चला आपलं क्लोजिंग . त्याच्या आत ही कर्जे मंजूर झाली पाहिजेत जेणे करून आमची तोट्यात गेलेली शाखा हा तोटा भरुन नफ्याकडे वाटचाल करील .नफा तर नाही होणार लगेच पण आमचा तोटा तर कमी होईल . हळूहळू आमची ही गाडी राईट ट्रॅकवर आली कि पुढील भविष्यही मग उज्वल राहिल . यासाठी तुमचाही हातभार हवा निलीमा मॅडम . या चार दिवसात तुम्ही मला चारही बॅलन्सशीटचं विश्लेषण द्याल अशी मी अपेक्षा करते , जेणे करून मला पुढील प्रोसेस करता येईल . ” मॅडम बॅलन्सशीटचं अॅनालिसिस करणं किती अवघड आणि  जोखमीचं असतं. फार बारकाईने अभ्यासपूर्ण हे काम करावं लागतं . आमची बारीकशी चूकही महागात पडू शकते ” ” होय निलीमा मॅडम , म्हणून तुमच्यासारख्या हुशार , प्रामाणिक , कर्तव्यदक्ष अधिकार्‍याकडे हे काम सोपवतेय . यापूर्वीही तुम्ही बर्‍याच बॅलन्सशीटचं विश्लेषण केलं आहे .यावेळीही तुम्ही चांगल्याप्रकारे हे काम कराल असा माझा विश्वास आहे . आणि तुम्ही ते करणारच याची खात्रीही आहे . मग शुभस्य शीघ्रम .आणि होय हे काम झालं कि तुम्ही घ्या दोन दिवस सुट्टी . तुमची तब्येत बरी नसतांनाही तुम्हांला काम करावं लागतंय याचं वाईट वाटत आहे , पण तुमची कामाप्रतीची निष्ठा व तुमचं मनोधैर्य हे काम करण्यास ऊर्जा देईल . आॅल दि बेस्ट ”

मी आपल्या सीटवर स्थानापन्न झाले .” विवेक जरा चहा सांगशील रे माझ्यासाठी ” मी आॅफिस बाॅयला आवाज दिला .गरम चहाचा एकएक घोट संपवत मी थोडीशी रिलॅक्स झाले .” दिपीका जरा तुलसी पाईपची फाईल दे ग “. फाईलमधून मी बॅलन्सशीट काढलं .” मनी कंट्रोल वेब साईट ओपन केली आणि बॅलन्सशीटच्या विश्लेषणाला सुरूवात केली .तुलसी पाईपच्या इतरही उपकंपन्या होत्या जसे तुलसी प्लाॅस्टिक ,तुलसी स्टील , तुलसी ट्यूब सोल्यूशन .आम्ही फक्त तुलसी पाईपसाठी कर्ज देणार होतो म्हणून.स्टँडअलोन बॅलन्सशीटच मला बघायचं होतं .
तुलसी पाईपची इमारत , वाहने , यंत्रसामग्री खरेदीसाठीची कर्जे , त्याचा परतावा .इक्विटिझ आणि लायबिलिटीझ मध्ये शेअर कॅपिटल रेशो स्थिर होता .
एकंदरीत हे बॅलन्सशीट तसे ओ के होते . माझे विश्लेषण पूर्ण करून मी माझे कव्हरींग लेटर तयार केले .

उद्या सर्कल हेडची ब्रांच व्हिजिट होती .त्यांना काय माहिती हवी , काय काय चेक करायचं आहे व ते कसं व्यवस्थित असेल याची यादीच मॅडमने माझ्याकडे दिली .रात्री उशिरापर्यंत मी व मॅडम सुलेखा आम्ही दोघींनी ते काम पुर्ण केलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.

आज मला गौरव इंडस्ट्रिजच्या बॅलन्सशीटचं विश्लेषण करायचं होतं . कंपनीची दिर्घकालीन कर्जे होती . तसेच शेअर कॅपिटलही भरपूर होतं .यातुन कंपनीचे दायित्व बरेच असल्याचे दिसत होते . मी कंपनीच्या आयपीओ पोस्ट वाचायला घेतल्या आणि शेअर फेस व्हल्यू व शेअर व्हल्यूतून शेअर प्रिमियमचा अंदाज घेतला .टॅक्स आणि लाभांश देऊन बरीच रक्कम शिलकीत राहात होती .तसेच कपनीच्या काही ठेवींवरील व्याज , कर्मचार्‍यांना व इतर उपकंपन्यांन्या दिलेल्या कर्जावरील व्याज पाहाता रिझर्व्ह व सरप्लस रेशो समाधानकारक वाटला .चला हे ही काम झाले हातावेगळे . मला खरंच खूप मोकळं वाटलं .

माई , खूप काम आहे काय ग तुझ्याकडे . चेहरा बघ किती कोमेजलाय तुझा ” ” काही नाही ग आई . आहेत नेहमीची कामं . बाकी काही नाही ” ” माझीही खूप सेवा करावी लागते तुला ” ” अग तुझ्या सेवेचा त्रास नाही होत मला .तू कशाला काळजी करतेस . बघ कशी ठणठणीत आहे मी . तू झोप आता .” मी आईच्या अंगावर पांघरुण घातले .

चला आता रात्रीच्या प्रशांतवेळी प्रसन्ना सिल्क मीलच्या बॅलन्सशीटचं काम उरकविण्यासाठी मी लॅपटाॅप हाती घेतला .यांच्या बॅलन्सशीटमध्ये मला कॅपिटल वर्क इन प्रोसेस , इन्व्हेन्टरी आणि व्यापारप्राप्तीचा दिलासा वाटला . मीलच्या इमारतीचे वाढीव बांधकाम होत होते , तसेच साठवलेला कच्चा माल ,अर्धवट प्रक्रिया झालेला कच्चा माल , पूर्ण झालेला पण विक्री बाकी असलेला माल .यातून बराच फायदा होणार होता .कंपनीने काही दीर्घकालीन तरतूदीही केलेल्या होत्या .मी माझे विश्लेषण पूर्ण केले आणि निद्रेच्या कुशीत शिरले .

प्रथमेश रि रोलिंगचा बॅलन्सशीट अहवाल मात्र मी चांगला नाही देऊ शकले .कंपनीने वेळोवेळी अल्पकालीन व दीर्घकालीन तरतूदी वापरल्या होत्या .व्यापारी देयकेही भरपूर होती .आणि इतर बर्‍याच लायबिलीटीझमुळे मी ते नाकारलं.

” निलीमा ,अभिनंदन . आज विभागीय कार्यालयातून तुमच्यासाठी अभिनंदनपर लेटर आलं आहे . तुमच्या कामाचा गौरव करण्यात आलाय . लेटस् सेलिब्रेट . आज एक छोटीशी पार्टी आपल्या स्टाफलाही देऊया ”

आजपर्यंत मी अनेक बॅलन्सशीटचं काम केलं होतं , टॅली केलं होतं , पण आयुष्याचं बॅलन्सशीट ते मात्र मी नाही टॅली करू शकले .आयुष्यभर मी प्रत्येकाला देतच राहिले , खूप देयके भरली . पण अॅसेटस् नाही मिळवू शकले . मी खूप चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न केला म्हणून माझ्या वाटेला चांगलं येईलच हा विश्वास फोल ठरला होता .कारण इतर घटक परिणाम करणारे होते .कधी घर , कधी समाज , आपले म्हणणारा मित्र गोतावळाही , कधी रूढी , कधी परंपराचा गुंता, हा चक्रव्यूह तोडणे जमलेच नाही .

जीवनाच्या ताळेबंदात आर्थिक स्थितीला फारसे महत्व नसते , कारण पैसा सर्वस्व नाही , तर माणूस किती आनंदी आहे आणि किती उपयुक्त आहे हे महत्वाचे .जीवनात नाव , यश , किर्ती बरोबरच आपल्या व्यक्तीची सोबत , घर , कुटुंब व त्यातून मुलाबाळांच्या रूपातून होणारी गुंतवणूक , भावनिक आस्था , त्यातून निर्माण होणारं प्रेम व्यक्तीला समृद्ध करत असतं .प्रत्येकाच्याच वाटेला हे सुख येत नाही व जीवनाचा ताळेबंद संतुलित होत नाही .

काय दोष होता माझा ? माझं शिक्षण ? माझी बुद्धीमत्ता ? माझं सौदर्य ? कि माझं सुख पाहू न शकणारे नात्यांचे बंध , मी नेतस्नाभूत कशी होईल हे पाहणारे माझे शुभचिंतक ? हितचिंतक ?

पण जाऊ देत . त्या त्या  घटकांनी आपापली कामे केली . माझा जीवनाचा ताळेबंद असंतुलित केला .पण हे संतुलन मी का साधू नये .स्वतःला या कष्टातून मलाच बाहेर यावं लागेल . माझ्याकडे चांगलं नाव आहे आणि प्रतिभाही आहे .शब्दांची संपत्ती आहे .ही अविनाशी संपत्तीच माझ्या जीवनाचा ताळेबंद मजबूत करणारी ठरणार आहे .

सद् भावना ही एक आणखी माझी संपत्ती .आणि ती मिळवायला मला आयुष्य वेचावे लागले आहे .माझ्या समवेतचा भोवताल , त्यातील दुःख , वेदना तसेच प्रसंगी आनंदालाही मी चढवलेला शब्दांचा साज , लेखणीची धार माझ्या सोबतीला आहे .

मोबाईलच्या रिंगटोनने माझी तंद्री भंग पावली . सु का देवधर कला , विज्ञान ,वाणिज्य महाविद्यालयातून फोन होता . ” नमस्कार मॅडम , मी प्रिन्सिपाॅल अनिल महाजन बोलतोय . पुढच्या आठवड्यात वासंतिक व्याख्यानमाला आम्ही आयोजित करीत आहोत .त्यातील ” जीवनाचा ताळेबंद ” यावर आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती करतोय . आपण येणार ना मॅडम ” ” होय सर , मी अवश्य येईन .” ” धन्यवाद मॅडम , मी ईमेल वर निमंत्रण पत्र पाठवतोय मॅडम , पुनश्च धन्यवाद . ” सरांनी फोन ठेवला .

” माझ्या विद्यार्थी मित्रांनो अॅसेटस् आणि लायबिलिटीझच संतुलन म्हणजे बॅलन्सशीट आपण शिकलात . लायबिलीटीझ जितक्या कमी तितके चांगले मानले जाते . पण जीवनाचे बॅलन्सशीट फार वेगळे असते मित्रांनो . जीवनाचा ताळेबंद म्हणजे व्यक्तीचं आत्मचरित्रचं म्हणता येईल .घर , कुटुंब , मित्र गोतावळा , नात्यांचे बंध , आपला भोवताल सगळेच घटक महत्वपूर्ण ठरतात . फार खोलात न शिरता काही महत्वाचे मुद्दे मी मांडणार आहे .तुम्ही या देशाचे भावी सूज्ञ नागरीक आहात . तुम्हांला मी काय शिकवाव.

तर जीवनाच्या ताळेबंदात
आमचा जन्म हा ओपनिंग बॅलन्य
मृत्यू हा क्लोजिंग बॅलन्स
आमच्या सर्जनशील कल्पना , सद् भावना संपत्ती
पुर्वग्रहदूषित विचार , द्वेष , ईर्शा , मत्सर , क्रोध हे आमचे दायित्व
ह्रदय ही वर्तमान संपत्ती , आत्मा ही स्थिर संपत्ती
नाव , यश , किर्ती हे आमचं खेळतं भांडवल
शिक्षण , ज्ञान , अनुभव हे सर्व आमचे जमा खाते
लोभ , स्वार्थ हे आमचे दायित्व
शिक्षण , ज्ञान , आणि आत्मसात केलेल्या कौशल्यामुळे तुमच्याकडील सगळी संपत्ती जरी कोणी काढून घेतली तरी तुम्हांला पुन्हा श्रीमंत होण्यात कोणतीही अडचण येणार नाही कारण तुमच्याकडील आयुष्याचा ताळेबंद मजबूत असणार आहे .

बस एवढंच माझ्या विद्यार्थी मित्रांनो
आपण मला इथे बोलावलंत , तुमच्याशी सुसंवाद साधण्याची संधी दिली. ऋणी आहे मी आपली .
नमस्कार
आज मलाही आंतरीक समाधान वाटले .

——————————————————————
लेखिका—शैलजा करोडे
नेरूळ नवी मुंबई
मो.9764808391

प्रतिक्रिया व्यक्त करा