वैभववाडी खरेदी विक्री संघ व सिंधुवैभव ऍग्रोच्या वतीने बाजार भावापेक्षा १५ रुपये जादा दराने काजु बी खरेदी
वैभववाडी :
वैभववाडी येथे सिंधुवैभव अॕग्रो फार्मर कंपनी व वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ यांच्यावतीने काजु बी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. आठवडा बाजारात सुरु असलेल्या बाजार भावापेक्षा १५ रुपये जादा दराने काजु बी खरेदी करण्यात आली. त्यामुळे काजु उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वैभववाडी तालुक्यात मोठ्याप्रमाणात काजु लागवड करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात काजु उत्पादनही होत आहे. माञ गेल्या २-३ वर्षापूर्वीपासून काजू बी दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे काजु उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे काजु उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. यासाठी काजु उत्पादक शेतकरी संघटीत होत काजुला हमीभाव मिळावा, अशी आग्रही मागणी शासन दरबारी करीत आहेत.
काजु उत्पादक शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेता सिंधुवैभव कंपनीचे अध्यक्ष महेश गोखले व तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्यासह पदाधिका-यांमध्ये बैठक होऊन या बैठकीत तालुक्यातील शेतकऱ्यांकडून बाजारभावा पेक्षा १० रुपये जादा दराने काजु बी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार बुधवारी आठवडा बाजार दिवशी तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाबाहेर काजु बी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे, जिल्हा बॕंक माजी संचालक गुलाबराव चव्हाण, कंपनीचे अध्यक्ष महेश गोखले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बोडके, संघाचे संचालक अंबाजी हुंबे, राजु पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी दळवी,प्रभानंद रावराणे, महेश रावराणे, आदी उपस्थित होते.