मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
शिव उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईतील देवराज हॉल, दादर येथे आयोजित करण्यात आले होते. राज्यभरात संघटना अधिक मजबूत करण्यासाठीच दादर येथे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील प्रमुख पदाधिकार्यांनीही अपेक्षित प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे व्यापारी, उद्याेजक, यांच्यासोबतच नवउद्योजक तरूणांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून शिव उद्योग संघटनेच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अधिवेशनांची सुरूवात अध्यक्ष दीपक काळीद,सरचिटणीस प्रकाश ओहळे, खजिनदार सचिन राक्षे, उपाध्यक्ष गोकुळ लगड, संजय कांबळे, राज्य कार्यकारिणी सदस्य भास्कर चव्हाण, ज्योती देशमुख, सावरकर आयएएस स्टडी सर्कलचे संचालक प्रा. महेश कुलकर्णी तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार समितीच्या प्रमुख सुधा साठ्ये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली.
अधिवेशनाचे प्रास्ताविक करताना राज्य कार्यकारीणी सदस्य तसेच कोकण संपर्क प्रमुख भास्कर चव्हाण यांनी वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे होऊ ही महत्वाकांक्षा बाळगा, हा मंत्र सदैव अमलात आणायचा प्रयत्न करण्यासाठी शिव उद्योग संघटनेची स्थापना झाल्याचे नमूद केले. खजिनदार सचिन राक्षे यांनी संघटनेची ध्येय आणि उद्दिष्टे त्याबरोबरच संघटनेचे भविष्यातील मार्गक्रमण याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रिसॉर्ट आणि इव्हेंट याबद्दल माहिती देतानाच या क्षेत्रातल्या व्यवसायाच्या विविध संधी नवउद्योजकांना खुणावत असल्याचे असल्याचे सांगितले.
संघटनेचे उपाध्यक्ष तसेच खानदेश संपर्क प्रमुख गोकुळ लगड यांनी कृषी उत्पादन समिती प्रमुख या नात्याने कृषी व्यवसायातील संधी साधताना आंतरजिल्हा कृषी व्यवसाय कशा पद्धतीने विकसित करणार आहोत याचा पट सभागृहासमोर विषद केला. उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी विदर्भ संपर्क प्रमुख या नात्याने विदर्भातील अकरा जिल्ह्यातील व्यवसाय आणि रोजगार संदर्भात मार्गदर्शन केले. साताऱ्याचे ॲडव्होकेट धीरज घाडगे यांनी कायदेशीर बाबींबद्दल सजग राहून उद्योग व्यवसाय कसे करावेत हे अधोरेखित केले.
केंद्र सरकारच्या एमएसएमइद्वारे देण्यात येणाऱ्या झेड सर्टिफिकेशनचे कार्य करणाऱ्या जीएसव्ही प्रा. लि.च्या संचालिका शितल राणे यांनी शिव उद्योग संघटनेच्या सहकार्याने झेड सर्टिफिकेशनचे काम केल्यास आर्थिक लाभ कसा मिळतो हे विस्तृतपणे सांगितले.
सावरकर आयएएस स्टडी सर्कलचे संचालक आणि शिव उद्योग संघटनेच्या भोजन समितीचे प्रमुख प्रा. महेश कुलकर्णी यांनी स्पर्धा परीक्षांच्या (युपीएससी, सीडीएस, एनडीए) प्रत्येक जिल्ह्यात शाखा उघडून व्यवसाय करतानाच देशसेवा कशी करणार आहोत हे सांगत ‘महाराष्ट्र हा देशाचा खडग् हस्त झाला पाहिजे’ ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वक्तव्याची जाणीव करून दिली. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रोराईटचे संचालक दिनेश मंडनगडकर मार्गदर्शन खूपच उपयुक्त होते.
मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर आंतरजिल्हा व्यवसाय संबंधी चर्चासत्रामध्ये तुषार आग्रे, मंगलदास देसाई, बाळू वाघमारे, विवेक खडपकर, मारुती कमते, प्रकाश वाळके, मनोहर सकपाळ यांच्या बरोबरीने राज्यातल्या इतर पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र अध्यक्ष दीपक काळीद यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. तसेच शिव उद्योग या मुखपत्राचे प्रकाशन करण्यात आले. सदर नियतकालिकासाठी संघटनेचे सचिव तसेच मीडिया टिमचे प्रमुख प्रकाश ओहळे यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात दीपक काळीद यांनी शिव उद्योग संघटनेच्या माध्यमातून व्यवसाय, रोजगार संबंधी ध्येय आपल्याला गाठायचे आहे. त्यासाठी विविध समितींच्यामार्फत आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजवायचे आहे. शिव उद्योग संघटनेच्या वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी कोणत्या पद्धतीने कार्य करावे याचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. आपल्या प्रत्येक कामाची प्रसिद्धी मीडिया टीम करणार आहेच. परंतु प्रत्येक महिन्याला पदाधिकारी आणि सदस्यांतून बेस्ट परफॉर्मर निवडला जाईल. त्याची मुलाखत शिव उद्योग मासिकात तसेच युट्यूब चॅनलद्वारे प्रसारित होईल असे आश्वासित केले.
सदर अधिवेशनाचे समयोचित सूत्रसंचालन मीडिया टीमचे गुरूदत्त वाकदेकर यांनी आपल्या शैलीत करत उपस्थितांची मने जिंकली. राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता झाली.