*वीज ग्राहक संघटना सावंतवाडीची बैठक “हॉटेल पर्ल” येथे पार पडली*
*भालावल ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचा झाला निर्णय*
सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची बैठक आज सायंकाळी ५.०० वाजता जगन्नाथराव भोसले उद्याच्या शेजारील हॉटेल पर्ल येथे पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर महावितरणच्या विरोधात दिनांक १५ मार्च २०२४ रोजी होणाऱ्या भालावल ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यावेळी वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड, तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा सचिव निखिल नाईक, तालुका सचिव संजय नाईक, समीर शिंदे, सुभाष सावंत, रामचंद्र राऊळ, संतोष तावडे, राजेंद्र सावंत, सुनील सावंत, समीर गवस आदी कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आजपर्यंत सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी गावागावात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. आतापर्यंत वीज ग्राहक संघटना सावंतवाडीने विविध विषयांवर आवाज उठविला असून उपकार्यकारी अभियंता सावंतवाडी यांना तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी जवळपास १० निवेदन पत्रे दिली आहेत. त्यामुळे महावितरण सावंतवाडीकडून तालुक्यात रखडलेल्या आणि आवश्यक असलेल्या काही कामांना सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. यापुढे सर्व कार्यकारिणी सदस्यांनी आपापल्या गावातील कामे प्राधान्याने करून घेण्यासाठी प्रयत्न करावा असे ठरविण्यात आले. त्याचबरोबर येत्या काही महिन्यातच पुन्हा पावसाळा सुरू होईल आणि विजेच्या समस्या पुन्हा निर्माण होतील. त्यासाठी उपकार्यकारी अभियंता सावंतवाडी यांना तालुक्यातील सर्व गावांमध्ये वीज तारांवर धोकादायक असलेली झाडी कटिंग करण्याबाबत निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तसेच तळवडे ग्रामपंचायतने वारंवार वीज खंडित होत असल्याने ६३ केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बदलून १०० केव्ही करण्याबाबत निवेदन दिले आहे, तसेच तळवडे बादेवाडी येथे कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतीपंप वगैरे चालत नसल्याने २०० केव्ही ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी केली, तळवडे येथील विजय काणेकर यांची हलर भाताची चक्की कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे चालत नसल्याचे दिलेला अर्ज, तळवडे येथीलच घन:श्याम त्रिंबक रेडकर यांच्या घराला लागून थ्री फेज विद्युत वाहिनी गेल्याने भविष्यातील धोका जाणून तारा दुसऱ्या बाजूला शिफ्ट करून देण्यासाठी दिलेला अर्ज, त्याचप्रमाणे शिवराम रेडकर यांचा मीटर बंद असल्यासाठी दिलेला अर्ज, या सर्व अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १५ मार्च २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या कार्यालयासमोर भालावल ग्रामस्थांचे महावितरण विरोधात होणारे उपोषण यशस्वी करण्यासाठी भालावल ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचा सर्वांनुमते निर्णय झाला.