You are currently viewing एक धाडसी पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर

एक धाडसी पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर

 

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी. या उपराजधानी मध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस उपायुक्त म्हणून अतिशय कर्तबगार धाडसी महिला पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. श्रीमती श्वेता खेडकर हे त्यांचे नाव. श्रीमती श्वेता खेडकर ह्या मूळच्या अमरावतीच्या. त्यांचं शिक्षण अमरावतीमध्ये झालं. त्यांच्या घरात कोणीही पोलीस खात्यात कार्यरत नव्हते. परंतु त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि या उपायुक्त पदापर्यंत मजल मारली. खरं म्हणजे त्यांचा स्पर्धा परीक्षा तयारीचा मार्ग आपण पाहिला तर तो खूपच खडतर आहे .पण जितने वाले कोई अलग काम नही करते वे हर काम अलग से करते है या न्यायाने त्यांनी संकटावर मात करून पोलीस उपायुक्त या पदापर्यंत मजल मारली आहे . थोर समाज सुधारक स्वर्गीय बाबा आमटे यांची एक कविता आहे .त्या कवितेमध्ये ते म्हणतात श्रृंखला पायीच असू दे .मी गतीचे गीत गाईन. दुःख झेलण्यास आता आसवांना वेळ नाही .या न्यायाने श्वेता खेडकर यांनी आपल्या आलेल्या अडचणीवर मात करून पोलीस उपायुक्त हे पद प्राप्त केले आहे .शिक्षण घेत असताना त्यांनी डीएड केले .तो काळ असा होता की डीएड करणाऱ्यांना ताबडतोब अध्यापकाची नोकरी मिळत होती. त्यांचे तसेच झाले .त्या डीएड झाल्याबरोबर त्यांना अमरावती जिल्ह्यात नोकरी मिळाली. अमरावती जिल्ह्यात नोकरी मिळाल्यानंतर पहिली पोस्टिंग नवीन उमेदवारांना मिळते ती धारणी आणि चिखलदरा या आदिवासी तालुक्यात. तिथे सेवा दिल्यानंतर मग अमरावती अचलपूर चांदूरबाजार चांदुर रेल्वे धामणगाव रेल्वे अशा ठिकाणी नेमणूक देण्यात येते. श्वेता ताईंना जे गाव मिळाले ते आडवळणचे .तिथे रोज एसटी बसने जाणे आणि एसटी बसने येणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला होता. जाण्या-येण्यामध्ये आणि बसची वाट पाहण्यामध्ये इतका वेळ जात होता की त्यांना अभ्यास करायला वेळच मिळत नव्हता. पण म्हणतात ना प्रबळ इच्छाशक्ती असली तर मार्ग निघतोच .त्यांनाही तसा मार्ग गवसला. जाण्यासाठी सोयीची बस होती. पण येण्यासाठी बसची तासन तास वाट पाहावी लागत होती .त्यावर त्यांनी मार्ग काढला .आपले बंधू मंगेश यांची त्यांनी मदत घेतली. शाळा सुटायच्या अर्धातास आधी मंगेश अमरावतीवरून मोटरसायकल घेऊन चिखलदराच्या त्या आडवळणाच्या गावात तयार राहायचा .शाळा संपली की शाळा ते अमरावती हे अंतर दीड दोन तासात कापून अमरावती गाठायची. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी अभ्यास सराव परीक्षा करायची .मंगेश मोटरसायकल घेऊन येत असल्यामुळे दोन तीन तास वाचले आणि त्या दोन-तीन तासांचा उपयोग त्यांनी आपल्या अभ्यासासाठी केला. खरोखरच हे नवीन पिढीसाठी एक आदर्श उदाहरण आहे. आज आपल्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. श्वेताताई जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपअधीक्षक परीक्षा पास झाल्या. तेव्हा या सर्व गोष्टींचा अभाव होता. पण कौन कहता है की आसमान मे सुराग नही होता एक तो पत्थर तबियतसे उछलो यारो या न्यायाने त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त केले आणि आज एक चांगल्या अधिकारी म्हणून त्यांचा सर्वत्र पोलीस खात्यात नावलौकिक आहे. त्या पोलीस उपअधीक्षक झाल्यानंतर त्यांना पहिले पोस्टिंग मिळालं ते सांगली जिल्ह्यामध्ये .तत्पूर्वी त्यांचे नाशिक येथे कडक ट्रेनिंग झाले. शरीराबरोबरच मनालाही वळण लावण्याचे काम या प्रशिक्षणाने झाले .या खडतर प्रशिक्षणानंतर प्रोबेशनवर त्यांना सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आले. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी तीन वर्ष सेवा दिली आणि इथूनच त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली .त्यांची तुमसर कार्यकिर्द खूप गाजली. तुमसर मध्ये त्यांनी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा आगळावेगळा पद्धतीने तपास करून त्यांना अटक केली. तसेच दुसऱ्या एका प्रकरणांमध्येही त्यांनी नोंदणीय काम केले. त्यानंतर अमरावती पोलीस आयुक्तालयात त्यांचे नेमणूक झाली. अमरावती मधील त्यांची कामगिरी ही पोलीस विभागात जमेची बाजू ठरली .त्यानंतर त्यांची बदली नागपूर पोलीस आयुक्तालयात झाली . पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे निष्ठेने काम केले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या महामार्गावर वाहतूक शाखेचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. हा महामार्ग फारच लांबलचक. पण एक महिला अधिकारी या एवढ्या मोठ्या महामार्गावर कसे नियंत्रण मिळू शकते ते त्यांनी आपल्या कौशल्याने सिद्ध करून दाखविले आणि आज अमरावती नंतर नागपूर नंतर राष्ट्रीय महामार्ग आणि आता परत नागपूर पोलीस आयुक्तालयात रुजू होऊन त्यांनी आपला कार्यकिर्दीचा ठसा उमटविला आहे .आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत .पोलीस विभाग हे देखील मागे राहिलेले नाही हे श्रीमती श्वेता खेडकर या उपायुक्त अधिकारी मॅडमनी सिद्ध करून दिले आहे. असे चांगले अधिकारी महिला अधिकारी वारंवार समाजातून निर्माण व्हावे अशी जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त अपेक्षा आहेत .श्वेता खेडकर यांची ही यशस्वी गाथा म्हणजे यशोगाथा वाचून काही तरुणींना प्रेरणा मिळाली तर या लेखाचे सार्थक होईल. तन-मन-धनाने पोलीस खात्याला समर्पण असलेल्या समर्पित असलेल्या उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व मानाचा मुजरा..

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती.

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा