देशामध्ये दिवसागणिक महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार देशात दिवसाला ८७ महिलांवर बलात्कार होतात. यामध्ये अगदी नवजात बालकांपासून ५० वर्षांच्या महिला आहेत. सर्वच वयोगटातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना देशात वाढत आहेत. अशा प्रवृत्तींना आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर आली. तीन वर्षापूर्वी एका चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करणा-या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२ जून २०१८ मध्ये बिहारमधील ३ वर्षाच्या निष्पाप मुलीवर एका व्यक्तीने बलात्कार केला होता. बलात्कारानंतर त्याने तिची निर्दयी हत्याही केली होती. याप्रकरणी न्यायालयाने पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी रामलाल मेहतो याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना समस्तीपूर जिल्ह्याशी येथील आहे. तब्बल तीन वर्षांनी या चिमुकलीला न्याय मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रामलाल महतो याने ३ वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला होता आणि त्यानंतर मृतदेह शेतात फेकला होता. ही चिमुकली आपल्या आजीच्या गावी काही दिवसांसाठी राहायला आली होती. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी या संदर्भात दलसिंहसराय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पीडितेचे कुटुंब उजियारपूर येथील आहे.