मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
“शिव उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी २ मार्च, २०२४ रोजी मुंबईतील देवराज हॉल, सेनापती बापट मार्ग, मनिष मार्केटच्या समोर, दादर (प.) येथे दुपारी २:३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. राज्यात संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून दादर येथे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य कार्यकारिणीसह राज्यातील प्रमुख पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनेकडून आयोजित करण्यात आलेले हे अधिवेशन महत्वाचे समजले जात आहे.
वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या “नोकरी मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे होऊ ही महत्वाकांक्षा बाळगा” ह्या विचाराच्या आधाराने संघटना उभी राहिली आहे. त्यामुळे सदर अधिवेशनात नोकरी, उद्योग तसेच व्यावसायिक मार्गदर्शन मान्यवरांकडून केले जाणार आहे. तसेच संघटनेचे मुखपत्र “शिव उद्योग”चे प्रकाशन देखील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. व्यावसायिक चर्चासत्रानंतर राज्यातल्या शिव उद्योग संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. अशा या भरगच्च कार्यक्रमासाठी राज्यभरातून प्रमुख पदाधिकार्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद यांनी केले आहे.