कोमसाप सावंतवाडी शाखेची आर्त हाक..!
विविध बँका, सावंतवाडी कुटीर रुग्णालयाला निवेदन केले सादर !
सावंतवाडी :
महाराष्ट्राची मायबोली अर्थात मराठीचे विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये संवर्धन व्हावे, यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने पुढाकार घेतला आहे. आज राजभाषा दिनानिमित्त कोमसाप, सावंतवाडी शाखेद्वारा सावंतवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ इंडिया शाखा सावंतवाडी आणि उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे कार्यालयीन अधीक्षक यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
यात बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य शाखाधिकारी मनीष कुमार झा, बँक ऑफ इंडियाचे मुख्य शाखाधिकारी शरद पेडामकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अमोल माने, तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, कार्यालयीन अधीक्षक रूपाली हेळेकर यांना निवेदन सादर करत कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने माय मराठीच्या संवर्धन आणि प्रचार, प्रसारबाबत विनंती करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व इतिहासकार प्रा. डॉ. जी. ए. बुवा, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कोकण मराठी साहित्य परिषदे शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे, कोमसापचे ज्येष्ठ सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, कोमसाप जिल्हा शाखेचे खजिनदार भरत गावडे, कोमसाप सदस्य प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस तसेच ‘सामाजिक बांधिलकी’ प्रतिष्ठानचे रवी जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेने या विविध संस्थांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे विनंती केली आहे की, कार्यालयातील कार्यालयीन कामकाजात मराठी बोली भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा. ‘मराठी भाषा दिन’ हा वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असून मराठी भाषेबाबत ते म्हणतात, “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी.!” या वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी ‘मराठी भाषा दिन’ शासनाच्या वतीने दरवर्षी साजरा केला जातो. मराठी भाषेचे संवर्धन करणे व मराठी भाषा वृद्धिंगत करणे हा यामागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने मराठी भाषा संवर्धन व जतन करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. आपल्या कार्यालयातील बुहतांशी अधिकारी व कर्मचारी हे इंग्रजी व हिंदी भाषेचा संवादामध्ये वापर करत आहेत, असे आमच्या निदर्शनास आले आहे.
तरी आपल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी आपल्या बोली भाषेत मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा, अशी विनंती आज ‘मराठी भाषा दिना’ निमित्त आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा – सावंतवाडीच्या वतीने आपणाला करित आहोत. तरी आपल्या कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत मराठी भाषेचा वापर ग्राहकांशी संवाद साधताना करावा, असे आपण त्यांना कृपया सूचित करावे.
यावेळी निवेदन स्वीकारलेल्या तमाम कार्यालयीन प्रमुखांनी आपण जास्तीत जास्त मराठी संवर्धनाचा प्रयत्न करू, असे कोमसाप सावंतवाडी शाखेला आश्वासित केले आहे.