You are currently viewing ऋण मराठीचे …

ऋण मराठीचे …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*ऋण मराठीचे …*

 

खूप लहान होते मी, कदाचित चार पाच वर्षांची असेन.

एवढेच आठवते की वडिलांनी अबकड चे कॅलेंडर भिंतीला

लावले होते व ते मला मुळाक्षरे शिकवत होते.नंतरचे फारसे काही आठवत नाही. तसे मला बालपण सरसकट आठवत

नाहीच. काही ठळक प्रसंग मात्र डोक्यात कोरलेले आहेत ते

आता ही चक्क डोळ्यांसमोर दिसतात. त्यातलाच वरील प्रसंग

आहे.

अक्षर ओळख घरीच झाल्यावर मला शाळेत घातले असावे.

आठवते ते असे, वर्गात पहिल्या रांगेत एक नंबरला मी बसत

असे. आल्या आल्या प्रार्थना वगैरे झाल्यावर वर्गात पाढे सुरू

होत असत. त्या मुळे माझा फायदा असा की मला रोज फक्त

“बे”चा पाढा म्हणावा लागे. तो सहज पाठ झाला होता. कठीण

पाढे माझ्या वाट्याला आलेच नाहीत त्या मुळे मी सुरक्षित असे. पण नंतर झाली ना उलथा पालथ! मग काय आमची

पाचावर धारण बसली ना? पुढचे पाढे कुठे येत होते ? पण संकट आले की मार्ग ही सुचतोच ना? मग मी फटाफट गुणाकार करून पुढचा आकडा म्हणत असे. अशी माझी सुटका होई रागावण्यापासून!

 

अक्षर ओळख झाली नि खऱ्या अर्थाने जग कळले ना?

हे ऋण कुणाचे? हाती लेखणी आली नसती तर …?

बाप रे! कल्पनाही करवत नाही. ही लेखणी हाती आली

नि तिचं” भाषेचं“प्रचंड दालन माझ्यापुढे खुलं झालं नि मी

तर वेडीच झाले. माहित नाही पण लहानपणा पासूनच मला

पुस्तकांचे वेड होते. जेम तेम दुसरी तिसरीत असेन मी तेव्हा

शाळेत लोखंडी पेट्या आल्या नि बऱ्यापैकी वाचणारी म्हणून

त्या पेट्या माझ्या ताब्यात आल्या. इतक्या जुन्या काळी शाळेतच यायला कुणी तयार नसे तेव्हा शाळेत कसली हो

लायब्ररी वगैरे? ती पेटी हाती येताच माझ्याहाती खजिना

लागला. चक्क सरोजिनी बाबरांची पुस्तके माझ्या हाती लागली एवढे आठवते. काय वाचले वगैरे फारसे आठवत

नाही.पण वाचन मात्र करत होते कारण गावात पेपर फक्त

आमच्या घरी येत असल्यामुळे रोज बातमी वाचायचे काम

(प्रार्थने समोर) माझ्याकडेच असे. भीती वाटायची पण बाईंसमोर नाही म्हणण्याची माझी हिंमत नव्हती. त्या मुळे

काहीतरी बातमी वहीवर लिहून आणायची व प्रार्थने समोर

वाचायची एवढेच माहित होते. नंतर “चांदोबा” मासिक

वाचल्याचेही आठवते.त्यातल्या चित्रांची लहानपणी फार

भीती ही वाटायची.

 

मंडळी, माय मराठीची ओळखच झाली नसती तर आज तुम्ही

तरी मला ओळखले असते का? मग ऋण कुणाचे आहे?

मराठीचेच ना? मराठी शिकलो, पचवली, पदवीधर झालो.

कुणामुळे? मराठीनेच तर ओळख दिली ना मला? नाहीतर मी

काय होते? एक सामान्य गृहिणी म्हणून संसार केला असता

व अज्ञातात विरून गेले असते.आज मला जी ओळख मिळाली

मी आयुष्यात काही तरी भरीव कार्य करू शकले ते मला मराठीने आत्मविश्वास दिला म्हणूनच ना? मला घडवले ते

मराठी भाषेनेच हे मी ठामपणे सांगू शकते. अहो, कोण कुठली

खेड्यातली मुलगी, जेव्हा शाळेत मुली तर जातच नसत तेव्हा

शाळा शिकली, नव्हे मराठीत एम ए झाली नि एम ए चा अभ्यास करतांना मराठी प्राचीन वाड्मयाचा खजिनाच तिच्या

हाती लागला नि तिच्या वाड्मयीन जाणिवा प्रचंड विस्तारल्या,

“ श्री गंगाराये सुत्ताले करवियले” पासून ते मुकुंदराज ते महानुभाव वाड्मयाचा तिने सखोल अभ्यास केला नि ती उत्तरोत्त्तर समृद्ध होत गेली. हे सारे श्रेय मराठी भाषेचेच नव्हे

काय? नक्कीच मराठीचे आहे.

धुळ्याला पी डी ला ॲडमिशन घेतली. खेड्यातल्या अत्यंत

भित्र्या मुली आम्ही अगदी नाकासमोर चालणाऱ्या, बस मध्ये

मुले असतात म्हणून दररोज अर्धातास पायपीट करून कॅालेजला जाणाऱ्या आम्ही मुली घाबरून कॅंन्टीन मध्येही

जात नसू! पण कॅालेज सुटले की सरळ लायब्ररी गाठायची

नि तीन ते चार पुस्तके घेऊन होस्टेल गाठायचे. जेवण झाले रे

झाले की कधी पुस्तक हातात घेते असे मला व्हायचे. त्या

दोन वर्षात( पी डी नि एफ् वाय)मी मराठीतील एक ही लेखक

मी

सोडला नाही. हरिभाऊ आपटें पासून फडके माडखोलकर

खांडेकर सारे लेखक त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांसह मी

वाचून काढले. दुपारी दोन ते तीन तास मी वाचत असे.

अगदी वेडी झाले होते म्हणाल तरी चालेल.प्रचंड वाचले मी.

आणि लग्ना नंतर नाशिकला आल्यावरही हा क्रम कधी चुकला नाही. ललितचे गठ्ठेच्या गठ्ठे मी वाचले. आणि मग

तिशीत नोकरीला लागल्यावर के टी एच एम कॅालेजची

लायब्ररी माझ्या हाती लागली नि मग काय तिथे ही हिराबाई

बडोदेकरांपासून चॅर्लीचॅप्लीन पर्यंत मी काही ही वाचायचे

बाकी ठेवले नाहीच ते आजतागायत अखंडपणे माझे वाचन

चालू आहे. फार फार श्रीमंत आहे हो आपली माय मराठी!

 

 

ह्या माऊलीचे प्रचंड कर्ज आहे माझ्यावर ! नोकरी करतांना

मराठी विषय शिकवायचा म्हणजे पुन्हा वाचन आलेच !

अभंग शिकवायचा , वाचा तुकाराम , सावरकर शिकवायचे,

वाचा”जन्मठेप” असा वाचनाला अंतच राहिला नाही. नि त्याचाच परिपाक असेल कदाचित १९९० पासून मी अचानक

कविता लिहू लागले. कवितेतील “क “ही न लिहिणारी मी आज

माझ्या नावावर सत्तावीस पुस्तके आहेत व शालेय अभ्यास

क्रमात माझ्या कविताही शिकवल्या जात आहेत हे ऋण

माय मराठीचे नाही तर कुणाचे आहे ?अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांची मी मानकरी आहे. बघा, वाचनाचे किती

फायदे असतात ते ! वाचनाने माझा शब्दसाठा इतका वाढला की मी एकटाकी कविता लिहिते, तुम्हाला खरे वाटणार नाही

फक्त पाच ते सात मिनिटात कुठलीही खाडाखोड न करता मी कविता लिहून बाजूला ठेवते. कुणाला ही प्रौढी वाटण्याची

शक्यता आहे, वाटो बिचाऱ्यांना , माझा नाईलाज आहे.

 

 

असे या माय मराठीचे माझ्यावर प्रचंड ऋण आहे नि अनेक

जन्म घेतले तरी ते फिटणार नाही म्हणून मी तिच्या ऋणातच

राहणार आहे.मराठीतून संवाद साधणे, मराठी गाणी ऐकणे ,

वर्गात मुलांना मराठी शिकवणे,मराठी चित्रपट पाहणे, काय आणि किती सांगावे या माऊली विषयी! हिनेच तर बहिणा बाईंची ही ओळख करून दिली ना? आणि कुसुमाग्रजांसारख्या

महान कवीच्या” काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात

“क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत”

 

अशा अभिजात भाषेशी ओळख झाली ती मराठी मुळेच ना?

मी तर म्हणते, तात्यासाहेबांनी फक्त “विशाखा” लिहून ते

थांबले असते तरी त्यांना “ ज्ञानपीठ” मिळाले असते इतक्या

श्रेष्ठ दर्जाच्या कविता विशाखात आहेत.अनेक कवी लेखक

शाहीरांनी नाटककारांनी माय मराठीला उच्चासनावर बसविले

आहे व ते तिचे स्थान अढळ आहे एवढेच मला सांगायचे आहे.

 

मंडळी , धन्यवाद !

 

आणि हो , नेहमी प्रमाणे ही फक्त माझी मते आहेत.

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि: २७ फेब्रुवारी २०२३

 

प्रतिक्रिया व्यक्त करा