*श्री.काडसिद्धेश्वर से.स.ट्रस्ट अध्यात्म केंद्रात सत्संग आनंद सोहळा संपन्न*
सावंतवाडी:
सावंतवाडी माठेवाडा येथील श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट अध्यात्म केंद्रात रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी सत्संग आनंद सोहळा श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या उपस्थितीत अलोट गर्दीत संपन्न झाला. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या अमृतवाणीतून प्रसवणाऱ्या अनमोल शब्दांना ग्रहण करून स्वामी दर्शनासाठी सिंधुदुर्गासह गोव्यातील शेकडो स्वामी भक्तांनी सावंतवाडी येथील अध्यात्म केंद्रात गर्दी केली होती. सायंकाळी ठीक सहा वाजता सुरू झालेला हा सत्संग आनंद सोहळा स्वामींचे प्रवचन, दर्शन व आरती, महाप्रसाद आदींसह रात्रौ १०.३० वाजेपर्यंत सुरू होता.
श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या प्रवचनासाठी ऐकण्यासाठी अनेक लोक भक्तगण आतुर झाले होते. ‘मी म्हणजे कोण..? हे जाणा, मी म्हणजे केवळ आपलं शरीर, मन आदी इंद्रिय नव्हे तर शरीराच्या आत असलेला आत्मा म्हणजे मी” असे सांगत स्वामींनी अनेक उदाहरणांसह विषयाचे महत्त्व विशद केले. एक गरीब व्यक्तीस श्रीमंतीचे आकर्षण असते. ती व्यक्ती ज्यावेळेस श्रीमंताकडे जाते तेव्हा श्रीमंत व्यक्ती त्याला सांगते “माझी संपूर्ण संपत्ती ऐश्वर्य मी तुला देतो, तू फक्त तुझे दोन डोळे मला दे’ आणि आपल्या डोळ्यावरील चष्मा काढते. गरीब व्यक्ती पाहतो तर त्या श्रीमंत व्यक्तीचे दोन्ही डोळे नव्हते. म्हणजे ज्या व्यक्तीने श्रीमंतीचे वैभव उपभोगलं परंतु त्याचं भौतिक सुख त्याला घेता आलं नव्हतं, त्याला त्या डोळ्यांचं महत्त्व संपत्ती पेक्षाही जास्त होतं. जे आपल्याला मिळालं त्यात समाधान माना, असा उपदेश स्वामींनी भक्तजनांना केला. लग्नात हुंडा म्हणून जावयाला चारचाकी गाडी दिली आणि गाडी चालवता येत नाही म्हणून गाडी शिकेपर्यंत काही महिने ड्रायव्हर, पेट्रोल खर्च आदी दिला. तर जावई ती गाडी घेऊन प्रातर्विधीला सुद्धा जाऊ लागला.
त्याचबरोबर एका व्यक्तीने सूर पेटी विकायला काढल्यावर ती घेण्यासाठी आलेल्या काही ग्राहकांनी तिची किंमत २०००/- कुणी ३०००/- अशी केली. परंतु एक अशी व्यक्ती आली ज्याने ती सूर पेटी ६००००/- रुपयांना विकत घेतली. म्हणजे ज्या त्या वस्तूची किंमत त्या त्या विषयात दर्दी असलेल्या व्यक्तीला असते. “गाढवाला गुळाची चव ती काय..?” असे सांगत स्वामींनी “आपले शरीर हे लाख मोलाचे आहे त्याची किंमत होऊ शकत नाही. तेव्हा व्यसनांच्या आहारी जाऊन आपलं आयुष्य बरबाद करू नका,” असा मौलिक सल्ला दिला.
तत्पूर्वी स्वामीभक्त प्रवचनकार डॉ.पराग मुंडले, (नाटळ, कणकवली) यांनी आपल्या रसाळ वाणीतून प्रवचन केले. भक्ताजनांना मार्गदर्शन करताना “नरदेहाची किंमत अडीज हजार कोटी आहे..” असे सांगत जीवनात माणसाने देहाला कमी लेखू नये.. आपण टूथपेस्टच्या जाहिराती पाहतो..जाहिरात करणाऱ्या आजीच्या तोंडात दात नसतात पण तरीही ती जाहिरात पाहून आपण पेस्ट खरेदी करून फसतो. असे सांगत कुठल्याही फसव्या जाहिरातींना फसू नका असा सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मळगाव येथील गायक सुनील पाडगावकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात “सद्गुरु वाचोनी सापडेना सोय.. धरावे ते पाय आधी आधी” हा सद्गुरुंचे जीवनातील महत्त्व विशद करणारा अभंग सादर केला, त्याला त्यांच्या नातवाने तबला संगत केली. या सत्संग सोहळ्याला नाम.दीपक केसरकर यांनी सदिच्छा संदेश देत शुभेच्छा दिल्या, माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर हे उपस्थित होते, त्याचप्रमाणे शेकडो भाविक भक्तगणांनी स्वामींच्या मधुर वाणीतील प्रवचनाचा आस्वाद घेतला. सामाजिक कार्यकर्ते रमेश पई यांनी महाप्रसादाचे आयोजन केले. यावेळी ज्येष्ठ भक्तगण गणू राऊळ गुरुजी, रमेश पई व सुनील पाडगावकर यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्संग आनंद सोहळ्याची उपस्थिती पाहून श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, सावंतवाडीचे अध्यक्ष परशुराम पटेकर, सचिव भगवान राऊळ आणि सदस्य भारावून गेले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समिती सदस्य दीपक पटेकर, मंगेश राऊळ, सुभाष राऊळ, गणू राऊळ गुरुजी, बाळा राऊळ, मनोज वारंग, बाळा वारंग, सखाराम गावडे, विनिता सातार्डेकर, सुमती कासकर, माधुरी कोरगावकर, मालिनी कोरगावकर, गीता टीळवे, रेखा मिशाळ, गणेश मिशाळ, मळगाव येथील भक्तगण आदी स्वामी भक्तांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.