सिंधुदुर्गात संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनतर्फे राबविण्यात आले ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान
जल परमात्म्याचे वरदान आहे आपण त्याचे अमृताप्रमाणे रक्षण करावे.- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
संत निरंकारी फाऊंडेशन तर्फे प्रोजेक्ट अमृतच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाणी स्रोतांचा 05 ठिकाणांवर स्वच्छता करण्यात आली. यावेळी सुमारे 500 पेक्षा जास्त निरंकारी अनुयायांनी सहभाग घेतला. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने जमा झालेल्या प्लास्टिक, काच व इतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली रविवारी सकाळी 8.00 वाजता ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या द्वितिय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट, आई. टी. ओ, दिल्ली येथून करण्यात आला. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीच्या प्रेरणेतून साकारलेली ही परियोजना भारतवर्षातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील 1533 ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आली ज्यामध्ये 11 लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला.
प्रोजेक्ट अमृत अंतर्गत “स्वच्छ जल – स्वच्छ मन” ही परियोजना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 05 ठिकाणांवर राबविण्यात आली त्यामध्ये संस्थानकालीन आत्मेश्वर तळी-सावंतवाडी, मिटक्याचीवाडी तलाव – कुडाळ, गणपती साना-कणकवली, खालची मोहूळवाडी तिर्लोट, देवगड, विठ्ठल रखुमाई मंदिर तळी, नाधवडे, वैभववाडी आदी ठिकाणांवर राबविण्यात आली. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील निरंकारी सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य तसेच अन्य निरंकारी भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. संबंधित सरकारी अधिकारी, प्रतिष्ठित नागरीक, लोकप्रतिनिधी व जनसामान्यांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
सद्गुरु माताजींनी “प्रोजेक्ट अमृत” प्रसंगी उपस्थित सेवादार व समाजातील विविध घटकांतून आलेल्या प्रतिनिधिंना संबोधित करताना आपल्या पावन आशीर्वचनामध्ये सांगितले, की आपल्या जीवनात पाण्याला फार महत्व आहे, जल हे अमृतासमान होय. जल आपल्या जीवनाचा मुलभूत आधार आहे. परमात्म्याने आपल्याला ही जी स्वच्छ व सुंदर सृष्टी बहाल केली आहे तिची देखभाल करणे आपले कर्तव्य आहे. मानवी रूपातच आपण या अमूल्य अमानतीचा दुरुपयोग करुन ती प्रदूषित केली आहे. आपण प्रकृतीला तिच्या मूळ रुपात प्रतिष्ठापित करुन तिची स्वच्छता करायला हवी. हे आपण आपल्या कर्मातून सांगायला हवे केवळ शब्दांतून नव्हे. कणाकणात व्याप्त परमात्म्याशी जेव्हा आपले नाते जोडले जाते आणि आपण याचा आधार घेऊ लागतो तेव्हा याच्या रचनेवरही आपले प्रेम जडते. आपण या जगात आलो आहोत तर या धरतीला आणखी सुंदर रुपात सोडून जाण्याचा आपला प्रयास असायला हवा. सहभागी झालेल्या अतिथीगणांनी मिशनची अत्यधिक प्रशंसा केली आणि सद्गुरु माताजींचे मनापासून आभार व्यक्त करत प्रकृती रक्षणार्थ निश्चितपणे एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे, अशी पुस्तिही जोडली.