सावंतवाडी शहरात जून्या मुंबई गोवा महामार्गावर टाकलेल्या गतिरोधकांना विरो
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर महत्वाचे तिठे व चौकांच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘रंबलर स्ट्रिप्स ‘ टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र, या स्ट्रिप्समुळे अपघात होण्याची तसेच वृद्ध व रुग्णांना त्रास होण्याचे कारण देत शहरातील काही माजी नगरसेवकांनी त्याला विरोध दर्शविला आहे. तर सर्वसामान्य नागरिकांमधून मात्र समाधान व्यक्त होत असून अपघात टाळण्यासाठी या गतिरोधकांची गरज असल्याचे बोलले जात आहे.
सावंतवाडी शहरातून मुंबई गोवा जूना महामार्ग जातो. या महामार्गावर नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या भागांतील वाढते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता या ठिकाणी गतिरोधक घालण्यात यावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार करण्यात येत होती.
या मागणीला अनुसरूनच हे रंबलर स्ट्रिप्स टाकण्यात येत आहेत. थर्मो प्लास्टीक पेंटच्या सहाय्याने टाकण्यात येणारे हे रंबलर्स केवळ वाहनांचा वेग कमी करण्याच्या उद्देशाने टाकण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर शहरातील उप जिल्हा रुग्णालय व न्यायालयासमोरील राजवाडा गेट समोर देखील अशा प्रकारे रंबलर स्ट्रीप्स टाकण्यात यावेत अशी मागणीही नागरिकांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सावंतवाडी नगरपालिका परिषदेचे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी शहरात काही ठिकाणी अनावश्यक जागी हे गतिरोधक टाकण्यात असल्याची माहिती दिली. या गतिरोधकांमुळेच उलट अपघात होण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांनी ते काढून टाकण्याची मागणी करीत तब्बल एक तास रास्ता रोको केला. त्यामुळे ते काम थांबविण्यात आले. तर माजी नगरसेवक विलास जाधव यांनी या गतिरोधकांच्या ठिकाणी सूचनेचे फलक लावण्यात यावेत, अशी मागणी केली.
सदरचे रंबलर स्ट्रिप्स हे रात्रीच्या वेळी वाहनांची वर्दळ नसताना टाकले जातात. या स्ट्रिप्स टाकण्यासाठी थर्मो प्लास्टिक पेंट चा वापर केला जातो. या पेंट मध्ये काचींच्या अवशेषाचा समावेश असल्याने रात्रीच्या वेळी वाहनांची लाईट पडल्यानंतर ते चमकतात. त्यामुळे वाहनधारकांच्या ते निदर्शनास येतात. या ठिकाणी वाहनांचा वेग कमी होत असल्याने अपघात टाळण्यास मदत होते.
अवजड वाहने व आलिशान कारना या रंबलर्सचा तेवढा परिणाम होत नसला तरीही दुचाकीना वेग कमी करावा लागतो. तर दुचाकिवरील रुग्ण, गरोदर महिला, वृद्ध तसेच अपंगांना याचा त्रास होत असल्याचे सुरेश भोगटे यांनी म्हटले आहे. तर अवजड वाहनांचा या ठिकाणी मोठा आवाज होत असल्याने आजूबाजूच्या नागरीकांना त्याचा त्रास होत असल्याचे सांगत याच गतिरोधकांमुळे उलट अपघात होतील अशी तक्रार करीत हे रंबलर्स काढून टाकण्याची मागणी केली आहे.