*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.दक्षा पंडित लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आयुष्य फुलासारखे*
अल्पायुषी जीवनाची
फुला नसे कधी खंत
भरभरून जगण्यात
होतसे तयाचा अंत…१
पुष्पगुच्छ सुमनांचा
करी मना आकर्षित
देवा मस्तकी,चरणी
होई विलीन मातित….२
फुलांच्या जगतात
ठायीठायी निरागसता
तया कडून शिकावी
जगण्याची समरसता….३
ना मद,मोह,अहंकार
सौदर्याचा नसे गर्व
अपेक्षा विरहीत जीणं
किती सुंदर पुष्प पर्व….४
सुकलेल्या फुलांनीही
सुगंधाने दरवळायचं
धरेस सुपीक करणं
काम त्यांनी करायचं….५
हातात हात घालुनी
फुलासारखे जगायचं
अंतिम क्षणापर्यंत
सत्कार्यात रमायचं….६
आयुष्य फुलासारखे
आम्ही सर्वांनी जगावे
पळभर जीवनातही
आनंद वाटत रहावे….७
डॉ दक्षा पंडित
दादर,मुंबई