मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, पिंपरी-चिंचवडला निघालेल्या दोघांचा मृत्यू
मुंबई
राज्यात दररोज अपघाताच्या काही ना काही घटना समोर येत असतात. आता पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात (Mumbai-Pune Expressway News) झाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई – पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर ओजेर्ड गावच्या हद्दीत हा अपघात झाला. मुंबईवरून पुण्याला येताना पहाटेच्या सुमारास कार चालकाने मालवाहू कंटेनरला मागून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.
या कारमध्ये सात प्रवासी प्रवास करत होते. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोमाटणे फाट्यावरील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मयुरी थोरात आणि सुनील थोरात अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत.
तर अक्षय थोरात, दत्तात्रय थोरात, तेजल थोरात, श्रद्धा थोरात आणि राजीव थोरात हे पाचजण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत . शिरगाव परंदवाडी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, थोरात कुटुंबीय मुंबईवरून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने निघाले होते. मात्र एक्स्प्रेस वेवरील कामशेत बोगदा क्रॉस केल्यावर गाडी ओव्हटटेक करण्याच्या नादात कारने कंटेनरला मागून धडक दिली. या अपघातामुळे थोरात कुटुंबावर शोककळा पसरली आहे.