माजी आमदार परशुराम उपरकर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक मोहिते यांच्याकडे मागणी
कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यात गांजा सहित अमली पदार्थांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. तसेच गुटखा, दारूची अवैध वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात होत असून याच्या मुळाशी जाऊन पुरता बीमोड करण्याची मागणी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासनही श्री मोहिते यांनी यावेळी दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात श्री. उपरकर यांनी श्री.मोहिते यांची भेट घेतली यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तुषार पाटील, सावंतवाडीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कु. सोळंकी उपस्थित होते. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव रमाकांत नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष हितेंद्र काळसेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष गुरु मर्गज आदी उपस्थित होते. जिल्ह्यात अमली पदार्थांचा वाढता वापर व होणारी विक्री यासंदर्भात मनसेच्यावतीने आवाज उठवण्यात आला. कुडाळ येथे मनसेच्यावतीने दोघा जणांना पकडून देण्यात आले. मात्र पकडण्यात आलेल्या दोघा जणांच्या पाठीमागे मोठे रॅकेट कार्यरत आहे. जिल्यातील तरुण, तरुणी या जाळ्यात ओढले जात आहेत. यापाठीमागे काही मोठ्या व्यक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या साऱ्याच्या मुळाशी जाऊन कारवाई करून अंमली पदार्थांच्या वापर व विक्रीला आळा अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यात गोवा बनावटीची दारू, गुटखा यांची अवैध वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पायबंद घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी गांभीर्याने घेऊन उचित कारवाई करण्यात येईल. कारवाईत कोणतीही हयगय केली जाणार नाही. पुढील दोन महिन्यात याचे रीजल्ट दिसतील, असे आश्वासन श्री मोहिते यांनी दिले असे श्री उपरकर यांनी सांगितले.