You are currently viewing फूल बसंती बसंती…

फूल बसंती बसंती…

*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासिका लेखिका कवयित्री सौ. भारती भाईक लिखित अप्रतिम ललित लेख*

 

*फूल बसंती बसंती…*

 

मोहक गारव्याचा गुंजारव चालला असतांनाच एखाद्या नववधूसारखी ती सायंकाळ वसंताच्या गवाक्षातून सलज्ज डोकावते नि अवघा आसमंत केशरी होत जातो…जणू केसर वस्त्रात, गुलबक्षी कंचूकी लेऊन ती नववधू संध्याप्रकाशात नील नभातील त्या लुकलुकणा-या सायंता-याच्या साक्षीने प्रियवरास भेटण्यास निघालीय….तिची नयन काजळरेघ पर्वतांच्या रेषेत जणूकाही लज्जेत गडद होत जाते. अवनीचा निरोप घेत निघालेला रवी आपली केशर आभा तिला अलगद प्रदान करतो….ती आभा अंगोपांगी लपेटून घेत ती ही केशर केशर होत जाते….।.

 

ऋतू वसंत येतोच मुळी नवचैतन्य लेऊन. ऋतू छेडीतो जणू राग वसंत बहार….नाद पैंजणाचा रुणझुणतो नि त्या नववधूच्या रुणझुणत्या पाऊलापाऊलात फूले बसंती मोहरतात. मजेत वा-यावर डोलणारी पीके कैक पीतफुलांना झुलवतात.. ।

 

हरीत झाडी उपवर होतात जणू. पीकांचं लेणं अंगभर भरभरून झुलवत झाडी संतोषी होत जातात. गाभुळलेलं असतं ते आम्रवृक्षाचं लेणं. तो मोहोर मधुर गंध ओसांडत असतो.पळस फुलून ती लाली अवनीला बहाल करतो. गारवा जरा काढतं पाऊल घेत उगाचच घुटमळतो नि अबोलसा उबदार दिलासा देऊन जातो. ते मनमोहक गुलाबीपण, ती संध्या नववधू आपल्या अधरी धारण करते. तिच्या मुक्त केशसंभारास तो खट्याळ वारा लाडीकपणे छेडत जातो..ती मधुगंधी वा-याच्या झोता बरोबरच आपला नाविन्याचा गंध , मनमुक्त पणे उधळून टाकते.

 

हलक्या पदन्यासात अवतरलेली ती संध्या नववधू आता आश्वस्तपणे रुळुन जाते…..न् जाते…. मोकळ्या नीलनभात नक्षत्रांच्या राशी गर्दी करु लागतात.नि चमचमणारी चांदण खडी लेऊन रेशमी काळोखाची चंद्रकळेत ती आता रजनी रुपात प्रकटू बघते. मंदसा चंद्र आता ठळक होत जातो….त्याला आपल्या निढळी सजवून रजनी शृंगाररत होते.

 

गुलाबी हवा अधिकच दाट होत जाते. मधुरम् वाटणारा हवाहवासा वाटणारा ऋतू वसंत निशेवर फूल बसंती उधळतो….नि त्या मोहक गंधात निशा न्हाऊन निघते. रातराणी गंधाळून मनमुक्त उमलून येते….मोग-याच्या कळ्या उमलू पाहतात….अशा चैतन्याच्या लयलूटीत ती आनंदी होत जाते….!!!

दूर कुठेतरी…चवथ्या प्रहरी… राग मालकंस छेडला जातो ….. निःशब्द शांत काळोखात सुस्तावलेली रजनी नाजूक आळोखी देत नयन पाकळी अलगद उघडते. अद्याप दवबिंदूंचं औक्षण झालेलं असतांना फूल पाकळ्या मोहरुन असतात. प्राजक्त नवगंधाचं लेणं लुटण्यास तत्पर असतो. परत संधीप्रकाश उमलून येतो.

 

धुक्याची दुलई दूर करीत ती नववधू आता प्रभा होऊन जाते….नि सुमंगल दवाचं न्हाणं करुन सुस्नात होते…..काळोखाची चंद्रकळा बदलून आता सोनवस्त्रे धारण करते. ती वस्त्राची सळसळ पानाफुलात मिसळते. सुवासिक फुलगंधाचं अत्तर श्वासात भरुन घेत सोनकिरणे अंगभर लपेटून घेते. विविध फुले आपल्या कुंतलात माळून ती पहाट नववधूसम नटून रवीची प्रतिक्षा करते. ….धुंद वसंत बहरलेला असतो. आम्रगंध मोहोरातून ओसांडत असतो…आणि अनुराग राग छेडीत मधुर कुहूकुहू…….कोकीळेचा सुस्वर आसमंती निनादतो…हर्षोल्लास प्रकटतो. नि

प्रकटलेली सुवर्णकिरणे चहूबाजूंनी हळूवारपणे स्पर्शताच….नवपरीणिता उषा अत्यानंदात न्हाऊन निघते.ओंजळीत भरुन घेते ती…फूले बसंती….पीत फुलांची ओंजळ तिला सुवासाचं लेणं देत जाते…!!!

 

सौ. भारती भाईक

प्रतिक्रिया व्यक्त करा