आंबोली ग्रामस्थांच्या जागरूकतेचे उपवनसंरक्षक यांचेकडून कौतुक, आरोपींमध्ये एका वकिलाचा देखील समावेश..
सावंतवाडी / आंबोली :
प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आलेल्या सहा आरोपींना सावंतवाडी न्यायालयाने तीन दिवसांची वन कोठडी सुनावली. गुन्ह्यात अटक आरोपी फरान समीर राजगुरू (वय २६), नेल्सन इज्माईल फर्नाडिस (वय ४२) दोघे (रा. सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली (वय ४२, रा. सावंतवाडी जेलच्या मागे), सर्फराज बाबर खान (वय ३४), रजा गुलजार खान (वय २३) दोघे (रा. बांदा गडगेवाडी), अरबाज नजीर मकानदार (वय २६, रा. माठेवाडा) आदींचा समावेश आहे. यातील फरहान हा पेशाने वकील असुन या सर्वांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम-1972 नुसार तसेच मनाई आदेश असताना हत्यारे घेऊन फिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबोलीच्या स्थानिक ग्रामस्थांनी गोळीबाराचा आवाज आल्यानंतर इनोव्हा कारमध्ये जाणाऱ्या संशयित आरोपींना हटकण्याचा प्रयत्न केला. परंतु वेगाने जाणाऱ्या कारमधील आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केल्याने यावेळी त्या ठिकाणी असलेल्या गावातील तपासणी नाक्यावरील युवकांकडून आरोपींच्या गाडीला अटकाव करून त्यांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान आंबोली सारख्या जैवविविधतेने नटलेल्या व पर्यटनाला पोषक असलेल्या ठिकाणावर शिकारी सारखे गैरप्रकार करणाऱ्यांवर वनविभागाकडून कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असून, या बाबत स्थानिक आंबोली ग्रामस्थांनी सदर शिकारीचा गुन्हा उघड करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस वनकिशोर रेड्डी यांनी आंबोली ग्रामस्थांच्या जगरूकतेची प्रशंसा करून यापुढे देखील अशाच प्रकारे दक्ष राहून वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सदरची कारवाई ही वनक्षेत्रपाल आंबोली सौ. विद्या घोडके, फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, वनपाल सौ. पूनम घाटगे, पोलीस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, पांडुरंग गाडेकर, गोरख भिंगारदिवे, अमृता पाटील, पूजा देवकुळे यांनी यास्वीरित्या पार पाडली.