You are currently viewing देवेंद्र भुजबळ : एक कर्तृत्ववान मुसाफिर

देवेंद्र भुजबळ : एक कर्तृत्ववान मुसाफिर

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभा पिटके लिखित व्यक्तीविशेष लेख..*

 

*देवेंद्र भुजबळ: -*

*एक कर्तृत्ववान मुसाफिर*

           उत्तरार्ध

 

देवेंद्रजीनी सेवेतून निवृत्त झाल्यावर आरामाचे जीवन न जगता विविध माध्यमातून लोकसेवा सुरूच ठेवली आहे.

त्यापैकी एक प्रमुख उपक्रम म्हणजे ‘न्युज स्टोरी टुडे’ वेब पोर्टल हे होय. कोरोनाच्या भयंकर काळात लोकांना दिलासा मिळावा म्हणून

इंग्रजी पत्रकार असलेली कन्या देवश्री ने हे पोर्टल सुरू केले .त्याचे कामकाज आई,वडील यांना शिकविले.येथे देवेंद्रजींच्या कामाचा, स्वभावाचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यांच्या ‘न्युज स्टोरी टुडे’ पोर्टल साठी मी जे साहित्य पाठविले ते त्यांनी ताबडतोब प्रकाशित केले. वास्तविक मी एक सामान्य स्त्री ! मोठ्या स्तरावर कुठेही माझी ओळख नाही. तरीही त्यांनी माझ्या लिखाणाची दखल घेतली. यासाठी मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन.

मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर आज देवेंद्रजी ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेबपोर्टलचे यशस्वी संपादक आहेत. तर अलकाताई पोर्तलची निर्मिती आणि तांत्रिक कामकाज बघतात.हे आंतरराष्ट्रीय मराठी पोर्टल आज ९० देशात पोहचले असून पाच लाखाहून अधिक ह्याचे व्ह्यूज आहेत. मराठी भाषा, बातम्या, लेख, साहित्य संस्कृती, पर्यटन, कला,आरोग्य, विकास, यशकथा अशा अनेक क्षेत्राचे जतन व संवर्धन व्हावे ह्यासाठी हे पोर्टल कार्य करते. यात प्रसिद्ध झालेल्या विविध विषयांवरील जीवनप्रवास, समाजभूषण, मी पोलीस अधिकारी (न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन) या लेखमाला पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्या ही अतिशय कौतुकास्पद कामगिरी आहे.या बरोबरच या वर्षात

न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशनने चंद्रकला ( कादंबरी),

पौर्णिमानंद ( कविता संग्रह) हुंदके सामाजिक

वेदनेचे( वैचारिक लेख संग्रह) अंधारयात्रीचे स्वप्न (चरित्र), अजिंक्यवीर ( चरित्र) ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

 

या पोर्टलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील लेखक, कवी व संबंधितांचे स्नेहमिलन घेतले जाते. अतिशय साधासुधा, अनौपचारिक असा हा कार्यक्रम एखाद्याच्या घरी घेतला जातो. तिथे अध्यक्ष, मुख्य अतिथी, सूत्रसंचालक किंवा हारतुरे नसतात. ओळखी पालखी होतात. मनमुराद गप्पागोष्टी होतात. हास्याची कारंजी मन प्रसन्न करतात. हा अनोखा कार्यक्रम आतापर्यंत संगमनेर, नाशिक, मुंबई, विरार, पुणे, नवी मुंबई, सातारा, ठाणे इथे झालेला आहे. आश्चर्य वाटेल पण अमेरिकेत न्यु जर्सी इथे सुद्धा हा कार्यक्रम घेतला गेला. अनेक लिहित्या हातांना या वेबपोर्टल मुळे प्रसिद्धी मिळाली आहे.

 

देवेंद्रजीनी आर्थिकदृष्ट्या आकर्षक बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून अतिशय विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडल्याने ते सतत सक्रिय राहिले.

दूरदर्शनवर गाजलेल्या “महाचर्चा” कार्यक्रमाचे चार वर्षे (२०० भाग) रिसर्च अँड रिसोर्स पर्सन व आकाशवाणीवरील “दिलखुलास” या कार्यक्रमाच्या पहिल्या पाचशे भागांचे टीमलीडर म्हणून त्यांनी काम केले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या वेबपोर्टल साठी “करियरनामा” हे सदर त्यांनीच सुरू केले. या सदरात त्यांनी २५० सरकारी अभ्यासक्रम व प्रशिक्षण यांची माहिती दिली. विविध वृत्तपत्रात हे सदर प्रसिध्द होत असे. पुढे या लेखांचे संकलन होऊन “करिअरच्या नव्या दिशा” हे पुस्तकही प्रकाशित झाले.

 

याशिवाय भावलेली व्यक्तिमत्वे, गगनभरारी, प्रेरणेचे प्रवासी, समाजभूषण ही त्यांची

यशकथांची ४ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

प्रतिकूल परिस्थितीने खचून न जाता जिद्द, चिकाटीमुळे आपण आपली प्रगती कशी करू शकतो, याचे सुंदर चित्रण या पुस्तकांतून केले आहे.

 

थोर व्यक्तींच्या जीवनावर आधारित “अभिमानाची लेणी” हे त्यांचे ई पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानने कोरोना काळात प्रसिद्ध केले आहे.

 

ऑस्ट्रेलियात सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात, त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” या विषयावरील व्याख्यान खूप गाजले. पुढे याच व्याख्यानावर आधारित त्यांचे मराठी – इंग्रजी पुस्तक देखील खूप गाजले.

 

मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. त्यांचा “भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता” हा वैचारिक संशोधनपर लेख अनेक भाषांत प्रसिद्ध झाला आहे.

 

सर्व माध्यमात सक्रिय असणारे देवेंद्रजी दुर्बल घटकासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांमध्येही काम करतात.

 

देवेंद्रजींना मिळालेल्या मानसन्मानाची यादी बरीच मोठी आहे. गेल्यावर्षी ६ जानेवारी या पत्रकार दिनी विकास पत्रकारितेतील कार्याबद्दल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेच्या हस्ते, “अप्रतिम मीडिया” तर्फे चौथा स्तंभ पुरस्कार, एकता सांस्कृतिक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तर ८ जानेवारीला त्यांच्या पत्नी, न्यूज स्टोरी टुडे या वेबपोर्टलच्या निर्मात्या सौ अलकाताई भुजबळ यांना माळी समाज मंडळ, ठाणे या संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार, नाशिक येथे माणुसकी सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला. हा दुग्ध शर्करा योग दोघांच्या कष्टाचे प्रामाणिक मेहनतीचे व कामाच्या जिद्दीने अथक परिश्रमाचे गोड फळ आहे. एकाच आठवड्यात तीन तीन मानाचे पुरस्कार मिळविणाऱ्या या आनंदी , कष्टाळू जोडप्याचे कौतुक तरी किती करावे? देवेन्द्र जी बद्दल माहिती मिळवितांना नवीन नवीन माहिती मिळतच राहिली कुठे थांबावे हे मलाच समजेनासे झाले आहे इतके उतुंग व्यक्तिमत्व असणारे देवेंद्रजी आहेत.

आपल्या नेहमीच्या परिचयाचे वाक्य असे की, यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते. पण भुजबळ कुटूंबासाठी हे वाक्य पुरेसे नाही. कारण अलकाताई देवेंद्रजीच्या मागे नाही तर बरोबरीने उभ्या राहिल्या. संसार तर यशस्वी केलाच पण सार्वजनिक क्षेत्रातही समाजासाठी दोघांनीही जे योगदान दिले ते शब्दातीत आहे.

 

अलकाताईं कॅन्सर वर

मात करून जिद्दीने उभ्या राहिल्या आहेत. या अनुभवावर आधारीत त्यांनी “कॉमा” हे पुस्तक लिहिले. या पुस्तकावर आधारीत माहितीपट तयार करण्यात आला असून तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोष्यारी यांच्याहस्ते त्याचे राजभवनात विमोचन झाले आहे.

 

देवेंद्रजी रितसर निवृत्त झाले. तर अलकाताईंनी चार वर्षांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतली. दोघेही नोकरीतून निवृत्त झाले असले तरी सेवेतून मात्र निवृत्त न होता, निष्क्रिय न होता उलट विविध प्रकारे सक्रिय राहून, होईल तेव्हढे समाज कार्य करीत आहे, ही खरंच आपण आदर्श घ्यावा, अशी बाब आहे. माझ्या प्रत्येक लेखनाला त्यांनी न्यूज स्टोरी मध्ये स्थान दिले ! त्यांचा जीवनप्रवास असाच पुढेही प्रगतीकडे वाटचाल करीत राहीन यात संशय नाही नवीन वर्षात इतक्या यशस्वी व्यक्तिमत्वाबद्दल मला जे सुचले ते लिहिण्याची मला संधी मिळाली हे माझें भाग्य! माझा प्रयत्न त्यांना व वाचकांनाही आवडावा ही प्रार्थना कारण देवेंद्रजी बद्दल लिहिणे वाटते तितके सोपे नव्हते पण हे देवेंद्र धनुष्य उचलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

– प्रतिभा पिटके. अमरावती

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा