कणकवली :
कणकवली कॉलेज, विज्ञान स्पेशल बॅच च्या कुमार परेश सतीश मडव याने जेईई मेन परीक्षेत देशातील टॉप चार टक्के विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान पटकाविला. परेशने या परीक्षेत ९६.५०% परसेंटाइल गुण घेत या दैदिप्यमान यशाला गवसणी घातली.
देशपातळीवर होणाऱ्या कठीण परीक्षातील एक परीक्षा म्हणून जेईई मेन कडे पाहिले जाते. भारतातील नामवंत एनआयटी तसेच ट्रिपल आयटी महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी जेईई मेन चे गुण महत्त्वाचे असतात. ही परीक्षा ३०० गुणांची असते. फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स या विषयांच्या सीबीएससी सिलॅबस वर घेतली जाते. सिंधुदुर्ग- रत्नागिरीतील विद्यार्थी या परीक्षेची तयारी करण्यासाठी मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, गोवा तसेच कोटा पर्यंत जात असतात. परेश ने कणकवली कॉलेजमध्ये शिकत असतानाच हे यश मिळविले. सुरुवातीपासून शांत, आत्मविश्वासू, मेहनती, जिद्दी व कठोर परिश्रम करणारा विद्यार्थी म्हणून परिचित आहे. परेश चे वडिल निवृत्त सेनाधिकारी व आई गृहिणी आहे. परेश हा जांभवडे- कुडाळ या ग्रामीण आणि एका बाजूला निसर्ग कुशीत असणाऱ्या गावातील प्रतिभावंत विद्यार्थी आहे. पहाटे उठून जांभवडे ते कणकवली कॉलेज एसटी प्रवास करून हे यश त्याने मिळविले. या कठीण परीक्षेची तयारी बरेच विद्यार्थी दोन ते तीन वर्षे करत असतात. पण परेश ने या चालू वर्षीच बारावी विज्ञान वर्षात शिकत असताना हे यश मिळवले म्हणून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. परेश आपल्या यशाचे सारे श्रेय आपले पालक, कुटुंबीय, दहावीपर्यंतचे शिक्षक व कणकवली कॉलेजचे विज्ञान विभागाचे शिक्षक यांना देतो. परेशचे वडिल सतीश मडव यांनीही कणकवली कॉलेजने खुप मेहनत घेतली म्हणून समाधान व्यक्त केले. तसेच “स्पेशल बॅच मध्ये मुलांकडून जास्तीत जास्त सराव करून घेतला जातो याचाही फायदा झाला.
परेश च्या मेहनतीला विज्ञान विभागाच्या सर्व शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले म्हणून यश मिळवणे शक्य झाले” असे आनंदोद्गार पालकांनी व्यक्त केले. जेईई अॅडव्हान्स मध्ये आणखी चांगले यश मिळवण्याचा मानस परेशने व्यक्त केला आहे. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजु, सर्व संस्था पदाधिकारी, प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक व विज्ञान विभाग प्रमुख प्रा. कांतीलाल जाधवर, सर्व शिक्षक बंधू-भगिनी, कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.