*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा ताई पिटके लिखित अप्रतिम लेख*
*देवेंद्र भुजबळ: एककर्तृत्वत्वान मुसाफिर*
*पूर्वार्ध*
मुंबई येथील सर्वद फाऊंडेशन, महाराष्ट्र ही समाजसेवी संस्था साहित्य, सामाजिक कार्य व उत्तम पत्रकारिता यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देत असते. यंदाचा हा सर्वद पुरस्कार मा देवेंद्रजी भुजबळ यांना १० फेब्रुवारी २०२४ अभय इंटरनॅशनल स्कूल विक्रोळी,मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
या निमित्ताने आपण जाणून घेऊ या
देवेंद्रजींचा प्रेरणादायी जीवन प्रवास….
श्री देवेंद्र भुजबळ हे मूळचे विदर्भातले ! त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण अकोल्याला झाले .ते चौथीत असतांनाच अचानक त्यांचे वडील वारले. कुटूंबाचा आधारच गेला, त्यामुळे आर्थिक स्थिती खूपच खराब झाली.अडचणींना सामना देत शिक्षण सुरू होते. एकीकडे काम करण्याची धडपड व अभ्यासही करायचा. त्यात विज्ञान आणि गणिताची नावड. यामुळे ते दहावीच्या परीक्षेत नापास झाले.
दहावीत नापास झाल्याने सर्वांना तोंड दाखवायची त्यांना लाज वाटू लागली, म्हणून त्यांनी अकोला सोडले आणि पुण्याला मोठ्या भावाकडे गेले. स्वभाव खूप स्वाभिमानी ! कष्ट करण्याची मनाची पूर्ण तयारी ! मिळेल ते काम प्रसंगी अगदी वेटरचे सुद्धा काम त्यांनी केले. असे वर्ष गेले आणि त्या अनुभवांनी शिक्षणाचे महत्व पटले. दीड वर्षाने दहावीची सप्लीमेंटरी परीक्षा दिली. गोरे सरांनी विज्ञान, गणिताची तयारी करून घेतल्याने ते दहावी पास झाले.
पुण्यात परत आल्यावर बी.कॉम ची पहिल्या वर्षाची परीक्षा झाल्यावर ते अहमदनगरला दुसऱ्या भावाकडे आले. येथेही त्यांची काम मिळविण्याची धडपड सुरूच होती. कारण स्वाभिमानी स्वभावामुळे भावाकडे पैसे मागणे त्यांना आवडत नसे. त्यांच्या मेहनती स्वभावामुळे नगर शहरातील स्वीट होम या मोठ्या आईस्क्रीम पार्लरचे मालक श्री छगनसेठ बोगावत ह्यांनी त्यांना पी.ए ची नोकरी दिली. तसेच त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे तेथील दै. समाचार मध्ये पत्रकार म्हणून काम करण्याची संधीही मिळाली. मग काय विद्यार्थी , पी. ए ,पत्रकार अशा तिन्ही भूमिका ते करु लागले. कामाचा अजिबात कंटाळा नाही हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, आजही कायम आहे. नुकतेच त्यांचे एक मोठे ऑपरेशन झाले आहे, तरीही कामाचा झपाटा तरुणांना लाजविणारा आहे.
देवेंद्रजींचे आईवडील खूप धार्मिक, श्रद्धाळू वृत्तीचे होते. परंतु लहान वयात ज्या विपदांना तोंड द्यावे लागले त्यामुळे त्यांचा देवावरचा विश्वास उडाला. ते नास्तिक झाले.
पुढे नगर कॉलेज मधून बी. कॉम झाल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठात पत्रकारितेचे रितसर शिक्षण घेतले. तिथे प्रा. ल. ना. गोखले ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिलेच विद्यार्थी !
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ दैनिक केसरीत उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर साप्ताहिक सह्याद्रीचे विशेष प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले.
पुढे मुंबई दूरदर्शन केंद्रात निवड होऊन ते १ मार्च १९८६ रोजी सहायक निर्माता म्हणून रुजू झाले. तिथे विविध कार्यक्रम त्यांनी केले.
देवेंद्रजीना राष्ट्रीय प्रसारणासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर माहितीपट बनविण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी अक्षरशः सोने केले असे म्हटल्यास चूक होणार नाही कारण या माहितीपटामुळे देवेंद्रजीचे कर्तृत्व फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशभरातून त्यांचे कौतुक झाले.
दूरदर्शन मध्ये असतानाच अलकाताईंशी त्यांचे लग्न झाले. त्यावेळी अलकाताई मुंबईलाच महानगर टेलीफोन निगम मध्ये नोकरीला होत्या.
देवेंद्रजी दूरदर्शनच्या आहे त्या नोकरीवर समाधानी न राहता , नोकरी करीत, डोंबिवली ते वरळी असा रोजचा भयानक प्रवास करत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत राहिले. त्यांची चिकाटी, जिद्द यामुळे त्यांची १९९१ मध्ये वृत्तपत्र व संज्ञापन अधिव्याख्याता (शिवाजी विद्यापीठ), यूपीएससी मार्फत आकाशवाणी व दूरदर्शनचे कार्यक्रम अधिकारी (३ पदे), सिनियर ग्रेड – भारतीय माहिती सेवा अशा ५ पदांवर त्यांची निवड झाली. त्यापैकी दूरदर्शनमध्येच असल्याने तिथेच ते कार्यक्रम अधिकारी या पदावर रुजू झाले. पण काही महिन्यातच त्यांची महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी, वर्ग – १ या पदासाठी निवड झाली. खरं म्हणजे त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव टिव्ही वाहिनी होती. प्रचंड ग्लॅमर होते. पण त्या मोहजालात न फसता, सारासार विचार करून ते अलिबाग येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रुजू झाले. येथे एक गोष्ट मला सांगितलीच पाहिजे ती म्हणजे, या पदावर रुजू होण्यापूर्वी ते आईचा आशीर्वाद घेण्यासाठी नगरला गेले तेंव्हा साहजिकच आईला खूप आनंद झाला. पितृछत्र हरविल्यावर, आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची असतांना स्वाभिमान न सोडता तिच्या लेकराने विविध क्षेत्रात घेतलेली गरूडझेप पाहून ती माऊली अतिशय सुखावली. पण त्याला निरोप देत असताना तिने आपल्या मुलाला जी शिकवण दिली ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणाली बाळा, पुढील प्रगतीसाठी माझे तुला खूप आशीर्वाद आहेतच पण त्याबरोबरच एक गोष्ट कधी विसरू नकोस, नेहमी सगळ्यांशी प्रेमाने वाग, माणुसकी सोडू नकोस ! तुझ्या वागण्याची सगळे आठवण ठेवतील असे वाग ! कुणाला दुखवू नको ! आणि देवेंद्रजीचे आजचे वागणे अजूनही तसेच आहे. पदाचा अभिमान त्यांनी कधीच बाळगला नाही.
माहिती खात्यात जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, संचालक अशा विविध पदांवर त्यांनी सतत लोकाभिमुख राहून काम केले. अनेक मान सन्मान, लोकांचे प्रेम मिळविले.
दूरदर्शन च्या सेवेत असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या मास्टर्स पदवी परीक्षेत ते प्रथम श्रेणीत सर्व प्रथम आले. तसेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली, यशदा, पुणे या संस्थांचे देखील अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत.
क्रमशः
लेखन:प्रतिभा पिटके
अमरावती