You are currently viewing जिल्ह्यातील ८० टक्‍के मनसे संघटना उपरकरांच्या पाठीशी – प्रसाद गावडे

जिल्ह्यातील ८० टक्‍के मनसे संघटना उपरकरांच्या पाठीशी – प्रसाद गावडे

जिल्ह्यातील ८० टक्‍के मनसे संघटना उपरकरांच्या पाठीशी – प्रसाद गावडे

रविवारी कुडाळ येथे निर्धार मेळावा…

कणकवली

सिंधुदुर्गातील मनसेचे ८० टक्‍के पदाधिकारी आणि कार्यकर्ते माजी आमदार परशूराम उपरकर यांच्या बाजूने आहेत. तरीही मनसे संघटनेने उपरकर यांना पक्षाबाहेर करण्याचा घेतलेला निर्णय दुदैवी आहे. आम्‍ही श्री.उपरकर यांच्या ठामपणे पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील राजकीय दिशा निश्चित करणार आहोत. त्‍यानुषंगाने रविवारी (ता.१८) कुडाळ येथे मेळावा होणार आहे. यात कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली जाणार असल्‍याची माहिती मनसेचे माजी पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी आज दिली.

कणकवली तेली आळी येथील भवानी सभागृहात प्रसाद गावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्‍यांच्यासोबत मंदार नाईक, बाबल गावडे, प्रकाश साटेलकर, दीपक गावडे. नाना सावंत, बाळा बहिरे, बाळकृष्ण ठाकूर, गणेश गावडे, सत्यविजय कविटकर आदी उपस्थित होते.

श्री.गावडे म्‍हणाले, जिल्ह्यातील मनसैनिकांमध्ये मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावरील प्रेम आणि निष्ठा तेव्हाही कायम होती आणि आताही कायम आहे. परंतु पक्षावर जमलेल्या काही बांडगुळांनी पक्ष संघटना स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे. माजी आमदार परशूराम उपरकर यांच्या सारख्या कार्यक्षम नेतृत्वाला आणि कार्यक्षम महाराष्ट्र सैनिकांना जाणीवपूर्वक बाजूला करून स्वतःच्या मर्जीतील अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना पदावर बसविले आहे. त्यामुळे पक्षाला सोडचिठी देण्याचा आम्‍ही सर्वांनी निर्णय घेतला आहे. आमचे नेते परशुराम उपरकर यांच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत. उपरकर जी भूमिका घेतील त्याला आमचा पाठिंबा असणार आहे.

ते म्‍हणाले, जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने मनसेला खिंडार पडले आहे.हे सर्व पदाधिकारी परशूराम उपरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आता सर्व पदाधिकाऱ्यांची मते व विचार जाणून घेण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील ओंकार डीलक्स सभागृहात निर्धार मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा झाल्यानंतर माजी आमदार परशूराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र बसून प्राप्त राजकीय परिस्थितीचा विचार करून भूमिका निश्‍चित करणार आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा