शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींसाठी ४२७ कोटीचे टेंडर मंजूर…
पाचशे बेडच्या हॉस्पिटलसह; वैद्यकीय निवासस्थाने आणि हॉस्टेलचा समावेश…
कणकवली
सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन अद्ययावत इमारतींसाठी पहिल्या टप्प्यात ४२७ कोटींचे टेंडर मंजूर झाले आहे. यात पाचशे बेडचे रूग्णालय, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह आदी कामांचा समावेश आहे. २० एकर जागेत या इमारती उभ्या राहणार आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी आज दिली.
श्री.सर्वगोड म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींसाठी ४२७ कोटींच्या निविदेला मंजूरी मिळाली आहे. ही निविदा ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून १८ मार्चला टेंडर ओपन केली जाणार आहेत. एकूण २० एकर जागेमध्ये ५०० बेडचे रूग्णालय, डीन यांच्यासाठी स्वतंत्र बंगला, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह आदींची बांधकामे यात होणार आहेत. दोन वर्षात या सर्व इमारती पूर्णत्वास जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ते म्हणाले, महाविकास आघाडी शासनाच्या काळात स्थानिक खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्याने सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले होते. त्यानंतर हे महाविद्यालय सध्या असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्येच सुरु करण्यात आले. मात्र आता महायुती शासनाच्या काळात केंद्रीयमंत्री नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या वैद्यकीय महाविद्यालयाला नवीन इमारतींसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ४२७ कोटींच्या टेंडरला शासनाने मान्यता दिली आहे. एकूण १० लाख स्क्वेअर फूटचे बांधकाम होणार असून वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाच्या अद्यायावत इमारती बांधल्या जाणार आहेत. यामध्ये फर्निचरसह इतर कामांचाही समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गात मंजूर झाल्यानंतर या महाविद्यालयासाठी अद्यायावत इमारतींची प्रतिक्षा होती. आता टेंडर मंजूर झाल्याने मार्चनंतर प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ अपेक्षित आहे.